पान टपरीपासून किराणा दुकानापर्यंत सुळसुळाट; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गुटखा बंदी कागदावरच आणि प्रत्यक्षात मात्र पान टपरीपासून किराणा दुकानापर्यंत गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. पेण-खोपोली बायपास मार्गावरून येणाऱ्या मोठ्या वाहनांद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. रसायनी हे गुटखा वितरणाचे केंद्र ठरत असल्याचे बोलले जात असून, पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्ह्यात गुटखा, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री आणि निर्मितीला बंदी असतानाही या अवैध धंद्याला पुन्हा वेग आल्याचे चित्र आहे. काही तासांतच मोठ्या प्रमाणात गुटखा विविध ठिकाणी पोहोचविला जात असल्याची चर्चा असून, पान टपरीपासून किराणा दुकानापर्यंत चढ्या दराने गुटख्याची विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या 15 ते 20 रुपयांना मिळणारा गुटखा बाजारात 35 ते 40 रुपयांना विकला जात असल्याचे बोलले जात आहे. अलिबाग, पोयनाड, रोहा, माणगाव, महाड आणि रसायनी परिसरात गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुटखा बंदी असतानाही हा व्यवसाय तेजीत कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे, गुटखा, मटका, जुगार आणि अंमली पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली होती. स्थानिक पोलीस ठाण्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आणि विविध ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले होते. मात्र, सध्या पुन्हा गुटखा विक्रीला वेग आल्याने पोलिसांची कारवाई केवळ दिखावा ठरली का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील मोठ्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असतानाही गुटखा वितरण करणाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. रसायनीमधून जिल्ह्यातील विविध भागांत गुटख्याचा पुरवठा होत असल्याच्या चर्चेची पोलिसांनी दखल घेऊन या अवैध साखळीचा छडा लावणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





