| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमध्ये टोकेखार भागात कोस्टल हायवे अंतर्गत तुरुंबाडी ते टोकेखार येथे 1200 कोटी रुपये खर्च करून मोठा पूल तयार होत आहे. सागरी महामार्ग जलद पार होण्यासाठी पुलाची निर्मिती होत आहे. सदरील पूल निर्माण करण्याचे काम एचसीसी कंपनी करीत आहे.
टोकेखार भागात पुलाचे काम करण्यासाठी तसेच मजुरांना राहण्यासाठी वीज खूप आवश्यक होती. यासाठी एचसीसी कंपनीने ना हरकत दाखला मिळण्यासाठी सावली ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर केला होता. यावेळी सावली ग्रामपंचायत ने सुद्धा काही अटी शर्ती ठेवून परवानगी देण्याचे मान्य सुद्धा केले होते. परंतु, ग्रामपंचायतीमधील कोणतीही परवानगी न घेता त्यांनी वीज अन्य मार्गाने मिळवली व ग्रामपंचायतीस कोणतीही विचारणा न करता आपले काम साध्य केले. यावर ग्रामपंचायतीमधील सर्व पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या बाबत तीव्र पडसाद उमटून सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला आहे. ज्या भागात कंपनी काम करते त्या घटकाला विश्वासात न घेता जर कंपनी मनमानी करीत असेल तर हे कदापी सहन केले जाणार नाही अशी प्रतिक्रिया सर्वच सदस्य यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत कंपनीचा निषेध करण्यात येऊन तसा बॅनर सुद्धा लावण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना सावली ग्रामपंचायत प्रशासक राजेश वाडेकर यांनी सांगितले की, एचसीसी कंपनीने वीज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आम्ही ते देण्यास सुद्धा तयार होतो. परंतु ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता त्यांनी अन्य मार्गाने वीज मिळवून ग्रामपंचायत हक्काचे खच्चीकरण केले आहे. याबाबत ग्रामसभेत चर्चा होऊन या कंपनीचा निषेध करण्यात असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ज्या भागात काम सुरू आहे त्या भागातील प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु, असेच जर सर्वजण हक्काचे खच्चीकरण केले तर ग्रामपंचायतीने कारभार कसा चालवावा हा प्रश्न सर्वांना पडला आहे.







