फक्त 10 टक्के कामे पूर्ण; 90 टक्के निधी वर्ग होऊनही विकास रखडला
| रायगड | प्रमोद जाधव |
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी मंजूर झालेल्या 43 कामांपैकी तब्बल 36 कामे अद्याप अपूर्णच आहेत. तीन कोटी 52 लाखांचा निधी मंजूर होऊन त्यातील 90 टक्के निधी तालुका स्तरावर वर्ग करण्यात आला असतानाही आतापर्यंत केवळ सात कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही विकासाची कामे रखडल्याचे चित्र समोर आले आहे. मार्च 2027 पर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास निधी शासनाकडे जमा होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या बृहत आराखड्यानुसार सार्वजनिक विकासकामांना मंजुरी दिली जाते. 2025-26 या वर्षासाठी वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाला तीन कोटी 52 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून समाजमंदिर, गटार, सभामंडप, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, विद्युत, पाईपलाईन आदी 43 कामांना मंजुरी देण्यात आली.
मंजूर निधीपैकी 90 टक्के निधी तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला. मात्र, निधी उपलब्ध होऊनही आतापर्यंत फक्त सात कामे पूर्ण झाली असून, 36 कामे अपूर्ण आहेत. म्हणजेच, मंजूर कामांपैकी केवळ 10 टक्के कामे पूर्ण करण्यात यंत्रणेला यश आले आहे. अपूर्ण कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा उर्वरित निधी समाजकल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे निधी असूनही कामे रखडल्याने अनुसूचित जाती, नवबौद्ध वस्त्यांचा सार्वजनिक विकास पुन्हा प्रतीक्षेत राहण्याची शक्यता आहे.
अशी मंजूर होतात कामे
ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या बृहत आराखड्यानुसार कामांना मंजुरी दिली जाते. समाजकल्याण विभाग आयुक्त कार्यालयाकडून निधी वितरीत केला जातो. कामानुसार 90 टक्के निधी गटविकास अधिकाऱ्यांना दिला जातो. काम पूर्ण झाल्यानंतर पाहणी, काम पूर्णत्वाचा दाखला, कामापूर्वी व कामानंतरचे छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित 10 टक्के निधी वितरीत केला जातो.
वस्ती सुधार योजनेवर दृष्टीक्षेप
मंजूर कामे : 43
शासनाकडून प्राप्त निधी : 3 कोटी 52 लाख रुपये
कामासाठी वर्ग केलेला निधी : 90 टक्के
पूर्ण कामे : 07
अपूर्ण कामे : 36
काम पूर्ण झाल्यावर शिल्लक निधी : 10 टक्के






