अलिबाग नगरपरिषदेत लोककल्याण मेळावा; योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात पथविक्रेत्यांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या व्यवसायाला अधिक स्थैर्य देण्यासाठी नगरपरिषद पुढाकार घेणार आहे. पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य, शासकीय योजनांची माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी नगरपरिषदेकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी दिली.
सरकारी योजना केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ पथविक्रेत्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी अलिबाग नगरपरिषदेने पुढाकार घेतला आहे. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या पुढाकारातून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PMSVANidhi) योजनेअंतर्गत लोककल्याण मेळावा व स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषद सभागृहात झालेल्या या मेळाव्याला पथविक्रेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मार्च 2020 पासून जून 2026पर्यंत अलिबाग नगरपरिषद हद्दीतील 556 पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. कोविड काळात व्यवसायावर परिणाम झालेल्या पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी या योजनेतून आर्थिक आधार मिळाला. केंद्र शासनाने या योजनेची मुदत आता मार्च 2030 पर्यंत वाढवली आहे.
योजनेअंतर्गत कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 7 टक्के व्याज अनुदान मिळते. तसेच मुदतपूर्व कर्जफेड केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. या सुविधांसह केंद्र शासनाच्या अन्य योजनांची माहितीही पथविक्रेत्यांना देण्यात आली.
योजना आणि लाभार्थी यांच्यातील दुवा मजबूत करण्यावर या मेळाव्यात भर देण्यात आला. बँक व्यवस्थापकांनी विविध योजनांची माहिती दिली, तर नगरपरिषद प्रशासनाने अर्ज, कर्जप्रक्रिया आणि उपलब्ध योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे केवळ कर्ज मिळवून देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न राहता पथविक्रेत्यांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सुमारे 120 लाभार्थी उपस्थित होते. पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना, प्रशासन आणि लाभार्थी यांच्यात थेट संवाद निर्माण करण्याचा अक्षया नाईक यांचा हा प्रयत्न ठरला.
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी ठोसर, नगरसेविका संध्या पालवणकर, निवेदिता वाघमारे, नगरसेवक संदीप पालकर, अंकित बंगेरा, समीर ठाकूर, निलम हजारे तसेच अन्य नगरसेवक-नगरसेविका, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे, DAY-NULM समुदाय संघटक स्नेहा रणदिवे आणि नगरपरिषद कर्मचारीही उपस्थित होते.
पथविक्रेते शहराच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना आर्थिक आधार आणि शासकीय योजनांची योग्य माहिती मिळाल्यास त्यांच्या व्यवसायाला स्थैर्य मिळू शकते. त्यासाठी नगरपरिषदेकडून आवश्यक सहकार्य केले जाईल.
– अक्षया नाईक, नगराध्यक्षा
पथविक्रेत्यांना केवळ कर्जाचा लाभ मिळवून देणे हा उद्देश नाही; त्यांना शासकीय योजनांशी जोडून व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आमची प्राथमिकता आहे.
– ॲड. मानसी म्हात्रे, सभापती






