जिल्हा परिषद अध्यक्ष संशयाच्या भोवऱ्यात?
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
साहेबांना सांगून बदली करून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लाचखोर भस्मेचा साहेब कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर संशयात भोवऱ्यात सापडले असल्याची चर्चा असून यामागील खरा सुत्रधार कोण याचा शोध रायगडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग घेतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या पवित्र पोर्टल अंतर्गत सुमारे 351 शिक्षकांचे समुपदेशन आणि समायोजन प्रक्रिया बुधवारी (दि.9) राबविण्यात आली होती. अलिबागमधील कुंठेबाग येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ही प्रक्रीया आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांच्या सोयी, अंतर, उपलब्ध रिक्त जागांचा ताळमेळ बसविण्यासाठी हे सत्र ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी समायोजन करण्यात आले होते. सुरुवातीला अवघड क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. दक्षिण रायगडमधील शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तक्रारदार यांच्या पत्नीची रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक म्हणून निवड झाली होती. समुपदेशानंतर त्यांना नियुक्त केलेली तळा तालुक्यातील वाशी हवेली ही शाळा देण्यात आली होती. मात्र तक्रारदार यांच्या पत्नीला सुधागड तालुक्यातील पाली येथील शाळेत बदली पाहिजे होती. बदली करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव योगेश म्हसे यांनी साहेबांना सांगून बदली करून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. अलिबागमधील समाधान हॉटेलमध्ये दुपारनंतर पैसे घेऊन या असे त्याने बुधवारी (दि.23) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सांगितले. या पडताळणीनंतर तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. रक्कम ठेवलेले खाकी पाकीट कापडी पिशवीतून काढून पुन्हा कापडी पिशवीत ठेवल्याचे दिसून आले. अखेर साडेचार वाजण्याच्या सुमारास योगेश भस्मेला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीमध्ये भस्मे याने साहेबांना सांगून बदली करून घेतो असा उल्लेख आहे. त्यामुळे लाच घेऊन भस्मे कोणत्या साहेबांकडून काम करून करून घेणार होता, असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भस्मे हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा स्वीय सचिव म्हणून काम करीत होता. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष वाकडीकर हे संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा जिल्हा परिषदेमध्ये सुरु आहे.
भस्मेच्या कारकिर्दीतील बदल्यांच्या चौकशीची मागणी
योगेश भस्मे गेल्या सहा महिन्यांपासून अध्यक्षांचे स्वीय सचिव आहेत. बदली करून देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणानंतर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात किती जणांच्या बदल्या झाल्या याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.





