13 हजार 597 गणेशमूर्तींचे होणार विसर्जन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यामध्ये 13 हजार 597 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यात घरगुती 13 हजार 439 आणि सार्वजनिक 158 मूर्तींचा समावेश आहे. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ अशी घोषणा देत आरती, पुजा करून नदी, तलाव व समुद्र अशा एकूण 500हून अधिक ठिकाणी मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या अलोट गर्दी असणार आहे. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये एक लाखाहून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सोमवारी (दि.14) झाली होती. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम दहा दिवस राबविण्यात आले. त्यात झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली असे अनेक संदेश उपक्रमातून देण्यात आले. काही मंडळामार्फत चंद्रयान, देशभक्तीचे देखावे उभे करण्यात आले आहेत. संत तुकारामांनी समाज प्रबोधनाचे काम केले. तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी खाद्य पदार्थांवरील भेसळ भ्रष्टाचार रोखण्यासाठी कारवाई केली. याचे देखावेदेखील अलिबागमधील घरत आळीमध्ये गणेशोत्सवात देखावे करण्यात आले आहेत. लोकगीत असलेले बाल्या नृत्यांचे सादरीकरण भजन, किर्तनदेखील या कालावधीत करण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवस भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजा सेवा केल्यानंतर अनंत चतर्दशीच्या दिवशी शुक्रवारी (दि.25) बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात येणार आहे. ढोल ताशांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत सायंकाळी चारनंतर जिल्ह्यातील अलिबागसह अनेक भागात मिरवणूका काढण्यात येणार आहे.
गणेशमूर्तींचे विसर्जन व मिरवणूक सोहळा आनंदात व शांततेत व्हावे, यासाठी रायगड पोलिसांमार्फत ग्रामीण भागासह शहरी भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी सात, पोलीस निरीक्षक 29, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक 128, पोलीस अंमलदार एक हजार 900, होमगार्ड 500, राज्य राखीव पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. गर्दीमध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या वेशात पोलीस नागरिकांमध्ये सामील केले जाणार आहे.





