म्हसळा शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा शहरातील भरवस्तीत रानमांजराने एका तरुणीवर हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यात जखमी झालेली तरुणी पोतदार हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, ज्या परिसरात ही घटना घडली त्या ठिकाणी शाळा असून विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे वन्यप्राण्याचा वावर शाळा परिसरातही होण्याची शक्यता असल्याने पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत रानमांजराचा वावर आणि तरुणीवर झालेला हल्ला यामुळे वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून संबंधित वन्यप्राण्याचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि संशयास्पद वन्यप्राणी आढळल्यास त्याच्या जवळ न जाता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







