| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडावर शासनाच्यावतीने प्रस्तावित दुसरा रोपवे प्रकल्प रायगडवाडी गावातूनच करण्यात यावा, अशी मागणी रायगडवाडी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री भरत गोगावले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ग्रामस्थांकडून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, खा. सुनील तटकरे, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच रायगड जिल्हा परिषद याच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.
नाणा दरवाजा, टकमक टोक महादरवाजा, हिरकणी बुरुज, मदारी मेहतर यांची समाधी, खुबळबा बुरुज आदी ऐतिहासिक स्थळांचे दर्शन रोपवेतून दौरा करता येईल. काळ जलविद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धरणाचा जलाशय व परिसराचे निसर्गरम्य दृश्य अनुभवता येईल. तसेच पाण्याची मुबलक उपलब्धता आणि मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या पार्किगसाठी जागा उपलब्ध आहे. रायगडवाडी येथून रोपवे झाल्यास किल्ले रायगड परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तू व स्थळांचे दर्शन पर्यटकांना रोपवेतून घेता येईल, असे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे. किल्ले रायगड, रायगडवाडी, परडी कोळीआवाड. टकमकी निजामपूर, बावले, वारंगी, वाघेरी आदी गावांना रोजगाराच्या संधी मिळतील. प्रस्तावित रोपवे रायगडवाडीमधून करण्यासाठी शासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास ग्रामस्थ तयार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. किल्ले रायगडाच्या पर्यटन विकासासोबतच परिसरातील गावांना रोजगार व विकासाची संधी मिळावी, यासाठी दुसरा रोपवे मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






