| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोंडले गावातील पाण्याची टाकी सध्या जीर्ण अवस्थेत असून, ती पडण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. टाकीच्या बांधकामाला ठिकठिकाणी तडे गेले असून, भिंतींची अवस्था चिंताजनक झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली ही टाकीच आता धोकादायक बनली आहे. टाकीच्या परिसरात नागरिकांची तसेच लहान मुलांची वर्दळ असते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. टाकी कोसळल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन टाकीची संरचनात्मक तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.







