| वाडा | प्रतिनिधी |
वाडा तालुक्यातील सोनशिव येथील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्ष प्रणित पुरोगामी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेतला. यावेळी जिल्हा चिटणीस सचिन मुकणे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.6) येथील विद्यार्थ्यांसह तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये निवेदन सादर करून तात्काळ बससेवा सुरू करण्याची मागणी केली.
या आंदोलनात्मक मागणीला प्रतिसाद देत सोनशिव गावातील किमान 50 शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी शेकापच्या विचारधारेवर आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या कार्यावर विश्वास ठेवून आपल्या न्याय मागणीसाठी एकजूट दाखवली. त्यानंतर संबंधित वाडा बस आगारप्रमुखांशी चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बससेवा सुरू करण्याची मागणी सचिन मुकणे यांनी केली. तसेच, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांसह कार्यकर्त्यांनी भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी सचिन मुकणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विद्यार्थ्यांची बससेवा तात्काळ सुरू करावी. अन्यथा शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वर्गच विभागीय कार्यालयात भरविण्याचे आंदोलन करण्यात येईल.” या मागणीची दखल घेत प्रांत अधिकाऱ्यांनी संबंधित आगार व्यवस्थापकाशी तात्काळ चर्चा करून बससेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित आगारप्रमुखांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून बुधवारी (दि.7) सकाळपासून विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.





