भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील मानवाधिकार तज्ज्ञांचा सन्मान
| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ न्यायाधीश आणि मानवाधिकार तज्ज्ञ नावाथेनम ऊर्फ नावी पिल्ले यांना 2026 चे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन आणि शांततेच्या संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. दरम्यान, शांततेचे नोबेल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यंदाही हे पारितोषिक मिळालेले नाही. पाकिस्तानने त्यांच्या नावाची शिफारस केली होती; मात्र नॉर्वेच्या नोबेल समितीने नावी पिल्ले यांच्या नावाची घोषणा केली.
नावी पिल्ले यांचा जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे कुटुंब भारतीय वंशाचे असून, त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1995 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. वर्णभेदाच्या काळात त्यांनी आंदोलकांची बाजू मांडत मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी लढा दिला.
नावी पिल्ले यांनी 2008 ते 2014 या काळात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. जगभरातील मानवाधिकारांचे संरक्षण, अन्यायाविरोधातील लढा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादात न्यायाधीश म्हणून काम करताना त्यांनी ऐतिहासिक खटल्यांमध्ये भूमिका बजावली. रवांडातील नरसंहाराच्या खटल्यात बलात्कार आणि लैंगिक हिंसाचार यांचाही विशिष्ट परिस्थितीत नरसंहाराचा भाग म्हणून विचार होऊ शकतो, हे अधोरेखित करणाऱ्या निकालात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षी, म्हणजे 2025 मध्ये, व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.





