म्हात्रोळीतील अन्यायग्रस्त आदिवासींचा सवाल; मांडवा पोलिसांकडून कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या घरांवर जेसीबी फिरवून त्यांना बेघर करण्याचा प्रकार अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील आदिवासीवाडीत घडला. काहींना दमदाटी करून, तर काहींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या घरांमधून हटविण्यात आले. या कारवाईत घरकुल योजनेंतर्गत बांधलेल्या घरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. दशरथ पाटील यांनी 24 मार्च 2024 रोजी जेसीबीच्या सहाय्याने घरे तोडल्याचा आरोप अन्यायग्रस्त आदिवासींनी केला आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला? आदिवासींच्या जमिनीवर वक्रदृष्टी असलेले नार्वेकर कोण? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा आणि आदिवासींना त्याच जागेवर घरे बांधून द्यावीत, अशी मागणी सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी पत्रकार परिषदेत केली.
उल्का महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी येथील आदिवासीवाडीत 20 हून अधिक कुटुंबे पिढ्यान्पिढ्या राहात आहेत. अशिक्षित असलेल्या या समाजातील महिला आणि पुरुष मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, 24 मार्च 2024 रोजी दशरथ पाटील यांनी जेसीबीच्या सहाय्याने या आदिवासींची घरे पाडली. कोणतीही पूर्वसूचना न देता धमकावून राहत्या घरांवर जेसीबी फिरविण्यात आला. घरातील साहित्य उद्ध्वस्त करून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडण्यात आले. या प्रकारामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
काही कुटुंबांना पैशांचे आमिष दाखविण्यात आले, काहींना दमदाटी करण्यात आली, तर काहींना कोणतीही रक्कम न देता घरांमधून हटविण्यात आल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाच्या 4 जानेवारी 2017 रोजीच्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीची मालक असल्याचा दावा करण्यात आला आहे. अलिबाग तहसील कार्यालयाच्या दप्तरी त्यासंबंधी नोंदी असून, आदिवासींकडे घरांच्या पावत्याही आहेत. असे असतानाही त्यांना त्यांच्या राहत्या जागेतून हुसकावून लावणे आणि घरे उद्ध्वस्त करणे, हा अन्यायकारक प्रकार असल्याचे उल्का महाजन यांनी सांगितले. या घटनेनंतर आदिवासी समाजाने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी तक्रारीची योग्य दखल न घेता उलट आदिवासींनाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उल्का महाजन यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आदिवासींच्या घरांवर जेसीबी फिरविणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आदिवासींची जमीन नार्वेकर यांच्यासाठी बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मोहन नाईक यांनी केला आहे. आदिवासींच्या विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी दुसरीकडे त्यांच्या जमिनींवर ताकदीच्या जोरावर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे म्हात्रोळीतील आदिवासींच्या जमिनींच्या प्रकरणात नेमके कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिलीप भोईर यांचे नावही चर्चेत?
शिंदे गटाचे जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांचे नावही या प्रकरणात चर्चेत आले आहे. दिलीप भोईर यांच्या घरी बोलावून जागेच्या बदल्यात दीपक नाईक या तरुणाला एक लाख रुपये देण्यात आल्याचे त्याने सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी दिलीप भोईर जागेवर उपस्थित होते, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एका बाजूला आदिवासी समाजाच्या हितासाठी असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे त्यांना काही रक्कम देऊन त्यांच्या जमिनी अन्य व्यक्तींना मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जेसीबीने घरे तोडली
म्हात्रोळी येथील आदिवासीवाडीत पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांची घरे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आली. दशरथ पाटील यांनी काही मंडळींसह येऊन हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आदिवासींना कोणत्याही सुविधा नसलेल्या जंगलातील भागात जाऊन राहण्याची धमकी देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. नार्वेकर यांच्यासाठी ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप असल्याने, हे नार्वेकर नेमके कोण आणि या प्रकरणात त्यांची भूमिका काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात दिलीप भोईर यांचा काही संबंध आहे का, याचीही चर्चा सुरू आहे.
आम्ही मोलमजुरीसाठी बाहेर गेलो होतो. त्यावेळी अचानक दशरथ पाटील जेसीबी घेऊन आमच्या वाडीवर आले. त्यांनी जेसीबीने आमची घरे तोडून मोठे नुकसान केले. आम्हाला दमदाटी करून बेघर करण्यात आले. आमच्या घरांचे आणि संसाराचे मोठे नुकसान झाले आहे.
सुमन नाईक,
पीडित महिला





