। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनासाठी दिल्लीत गेलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत दिपके शनिवारी सकाळी आंदोलनासाठी दिल्लीत गेले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताच त्यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. यानंतर अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांना केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कृतीविरोधात आगपाखड केली होती. त्यांनी काहीवेळापूर्वीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या मुलाची पाठराखण केली होती. मात्र, यानंतर काहीवेळातच अभिजीत दिपके यांच्या वडिलांच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हिंगोलीतील संतूक पिंपरी या मूळगावी अभिजीत दिपके यांच्या आजीचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांना दिल्लीतील आंदोलन सोडून महाराष्ट्रात परत यावे लागण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीने पुकारलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आहे. सावित्रीबाई शंकर दिपके असे त्यांचे नाव होते. त्या 85 वर्षांच्या होत्या. अभिजीत दिपके निर्णायक लढ्यासाठी दिल्लीत असताना अभिजीत यांच्या आजीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिजीत दिपके यांची आजी आजारी होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.







