गरबा, भजनांसह विविध उपक्रमांची रेलचेल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणरायाला निरोप दिल्यानंतर आता रायगड जिल्ह्यात दुर्गादेवीच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांसह घरोघरी तयारी पूर्ण झाली असून, रविवारी (दि. 11) जिल्ह्यात तब्बल 5 हजार 153 ठिकाणी घटस्थापना होणार आहे. यामध्ये दुर्गादेवीच्या 434 मूर्ती, 3 हजार 527 घट आणि 192 प्रतिमांचा समावेश आहे. देवीच्या स्वागतासाठी मिरवणुका, आरती, भजन, गरबा-रास आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गादेवीच्या आगमनाची लगबग सुरू होती. ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी उत्साहाचे वातावरण असून, सार्वजनिक तसेच खासगी नवरात्रोत्सव मंडळांनीही जोरदार तयारी केली आहे. रविवारी (दि. 11) देवीचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पेहरावात विधीवत पूजा करून घटस्थापना केली जाणार आहे. काही ठिकाणी देवीच्या मूर्ती आणि प्रतिमांची वाजतगाजत, फुलांची उधळण करीत मिरवणूक काढून स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर आरती, पूजा आणि भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. अबालवृद्ध या उत्सवात सहभागी होऊन देवीच्या आगमनाचा आनंद लुटणार आहेत.
जिल्ह्यात 20 ऑक्टोबरपर्यंत भजनांसह सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजनांच्या स्पर्धा, बाल्या नृत्य, गरबा-रास यांसारख्या कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवात रंगत येणार आहे. अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील चिद्बादेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घटस्थापनेनंतर रविवारी (दि. 11) सायंकाळी साडेसात वाजता कुरुळ येथील नवयुग भजन मंडळ आणि हनुमान प्रासादिक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि. 12) मानकुळे येथील श्रीदत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ आणि वढाव-वेलवली येथील श्री गणेश प्रासादिक भजन मंडळाचे भजन होईल. मंगळवारी (दि. 13) सायंकाळी नवेदरबेली येथील श्रीसिद्धिविनायक भजन मंडळाचे भजन, तर रात्री कुरुळमधील साईनाथ कला पथकाचे सादरीकरण होणार आहे. बुधवारी (दि. 14) दांडिया नृत्य, गुरुवारी (दि. 15) सुरसंगम ऑर्केस्ट्रा, तर शुक्रवारी (दि. 16) महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. 17) पहाटे पाच वाजता काकड आरती आणि सायंकाळी ‘रंगल्या गौळण’ हा गीतांचा कार्यक्रम होईल. रविवारी (दि. 18) दुपारी जोड भजनांचा जंगी सामना, तर सोमवारी (दि. 19) फॅन्सी ड्रेस, बक्षीस वितरण आणि दांडिया नृत्याचे सादरीकरण होणार आहे. मंगळवारी (दि. 20) बैलजोडी, सजावट व प्रदर्शन, मिरवणूक, सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम तसेच नवरात्र घटाची दांडियासह विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलीसही सज्ज झाले आहेत. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 37 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. यामध्ये 137 पोलीस अधिकारी, 1 हजार 500 पोलीस कर्मचारी, 400 होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एका तुकडीचा समावेश आहे.







