खोपोली अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात; वाहतूक काही काळ ठप्प
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
खोपोली-कर्जत मार्गावरील डोलवली येथे रविवारी (दि.11) दुपारी एका स्कोडा कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत येथील एक तरुण खोपोलीकडे आपल्या कारने जात असताना डोलवली जवळ अचानक कारने पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मात्र, तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संपूर्ण कार जळून खाक झाल्याने वाहन मालकाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. कारला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.







