| तळा | प्रतिनिधी |
वरळ गावातील मुंबईकर युवकांनी यंदा नवरात्रोत्सवात एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन करणाऱ्या या युवकांनी यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यातील पाणीटंचाई ओळखून श्रमदानातून वनराई बंधारा उभारला आहे. वरळ येथे दरवर्षीप्रमाणे आई वाघेश्वरी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, केवळ धार्मिक उत्सवापुरते न थांबता गावाशी असलेली नाळ जपत वरळकर युवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. युवकांच्या संकल्पनेतून आणि स्वतःच्या श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे आणि नदीचे वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात गावाला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. ‘गावचा उत्सव, गावचे पाणी आणि गावचे भविष्य’ या भावनेतून राबवलेला हा उपक्रम केवळ धार्मिक परंपरा जपणारा नसून पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाची जबाबदारीही अधोरेखित करणारा आहे. मुंबईत राहूनही गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या वरळकर युवकांचा हा स्त्युत्य उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.






