विविध प्रकारच्या कंदिलांना ग्राहकांची मागणी
| खांदेश्वर | प्रतिनिधी |
दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी कंदिलांची सजावट दिसू लागली आहे. पनवेलच्या ऐतिहासिक लाईन आळीमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून महेश गायकर हे पारंपरिक कंदीलनिर्मितीची कला जपत आहेत. लहान आकारापासून मोठ्या कंदिलांपर्यंत, चांदणी कंदील आणि 36 कांडीच्या कंदिलांसह विविध प्रकारचे कंदील त्यांच्या हातून आकार घेत आहेत.
काळानुसार कंदीलनिर्मितीच्या साहित्यामध्ये आणि डिझाइनमध्ये बदल झाले आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या कंदिलांसोबत आता बाजारात विविध रंगांचे कॉटन कागद, आकर्षक नक्षी आणि सॅटिन रिबीनचा वापर करून कंदील तयार केले जात आहेत. नव्या डिझाइनमुळे हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यावरही भर दिला जात आहे.
दिवाळीच्या सजावटीत कंदिलाला विशेष महत्त्व असते. घराच्या प्रवेशद्वारावर लावलेला रंगीबेरंगी कंदील सणाचा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळे पारंपरिक कंदिलांपासून आधुनिक डिझाइनपर्यंत विविध पर्यायांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. गेल्या काही वर्षांत कंदील बनविण्यासाठी लागणारे साहित्य महाग झाले आहे. कागद, रिबीन आणि इतर साहित्याच्या वाढत्या किमतींचा परिणाम व्यवसायावर होत असला, तरी महेश गायकर यांनी त्याचा भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडू नये, याची काळजी घेतली आहे.
आधुनिकतेच्या युगात बाजारात अनेक आकर्षक सजावटीच्या वस्तू उपलब्ध होत असल्या, तरी हाताने बनविलेल्या कंदिलांचे वेगळेच आकर्षण आहे. पनवेलच्या लाईन आळीतील महेश गायकर यांची कंदीलनिर्मिती ही केवळ व्यवसायाची गोष्ट नसून, पारंपरिक कलाकुसर जपतानाच दिवाळीचा आनंद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ठरत आहे. दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा आणि दारात झळकणारा रंगीबेरंगी कंदील अशा वातावरणात पनवेलमध्ये दिवाळीची चाहूल आता अधिक गडद होऊ लागली आहे.
सर्वसामान्यांना परवडणारे दर
दिवाळी हा केवळ श्रीमंतांचा नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाचा सण आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात कंदील लावून दिवाळीचा आनंद साजरा करावा, अशी महेश गायकर यांची भावना आहे. त्यामुळे चाळीस वर्षांपासून कंदीलनिर्मितीची परंपरा जपत त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांचा विचारही कायम ठेवला आहे. महागाईतही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे दारात कंदिलांची विक्री केली जात आहे.







