| कोलाड | प्रतिनिधी |
विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून दुर्गप्रेमींच्या वतीने गोमाशी गडावर प्रथमच गडपूजन करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला असून, या उपक्रमामुळे गडप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षी गोमाशी गडाचा शोध लागल्यानंतर दुर्गप्रेमीनी गडावर जाऊन स्वच्छता व साफसफाई केली होती. यावेळी गडावर असलेल्या काही ऐतिहासिक शिळाही त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर गडाचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या उद्देशाने दुर्गप्रेमींकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
यंदा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुर्गप्रेमींनी गडावर जाऊन प्रथमच गडपूजन केले. यावेळी गडावर पहिले तोरण बांधण्यात आले, तसेच शिवकालीन शस्त्रांचे विधिवत पूजन करण्यात आले. ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा जतन करणे, त्यांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि गडसंवर्धनाची भावना समाजात रुजवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या गडपूजन व शस्त्रपूजन सोहळ्यात दुर्गप्रेमी आनंद सानप, कृष्णा जाधव, ओंकार मोरे, सचिन कळमकर, सुमित भोसले, अर्णव चांदोरकर, प्रांजल येलकर, साक्षी भालेकर, सानिका साळवी, सिद्धी निकम, त्रिशा शिंदे, शुभम वरे, तन्मय सानप, वैभव भोसले आदी दुर्गप्रेमी सहभागी झाले होते.
गोमाशी गडावर प्रथमच पार पडलेले हे गडपूजन ऐतिहासिक वारसाच्या जतनासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, दुर्गप्रेमींच्या या उपक्रमाचे इतिहासप्रेमी व शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे.







