| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे 20 व्या राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धा 2026 साठी रायगड जिल्ह्याचा संघ निवडण्याकरिता 25 ऑक्टोबर 2026 रोजी पिल्ले एचओसी एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, रसायनी येथे जिल्हास्तरीय ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्पर्धा 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत वॉक्सन विद्यापीठ, कामकोले, सदाशिवपेट, हैदराबाद, तेलंगणा येथे होणार आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा अधिकृत संघ सहभागी व्हावा, या उद्देशाने जिल्हास्तरीय निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी 14 वर्षांखालील व 16 वर्षांखालील मुला-मुलींचे गट असतील.
14 वर्षांखालील गटासाठी 17 नोव्हेंबर 2012 ते 16 नोव्हेंबर 2014 या कालावधीत जन्मलेले खेळाडू पात्र असतील. 16 वर्षांखालील गटासाठी 17 नोव्हेंबर 2010 ते 16 नोव्हेंबर 2012 या कालावधीत जन्मलेले खेळाडू पात्र असतील. 14 वर्षांखालील गटातील खेळाडूचे वय 16 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 12 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 14 वर्षांखालील गटात ट्रायथलॉन प्रकार, (60 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, बॅक थ्रो, 600 मीटर धावणे आणि किड्स भालाफेक या प्रकारांचा समावेश आहे. 16 वर्षांखालील गटात 60 मीटर धावणे, 80 मीटर अडथळा शर्यत, 600 मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक आणि पेंटॅथलॉन या प्रकारांचा समावेश असेल. सर्व स्पर्धा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या लागू नियमांनुसार घेण्यात येतील. 14 वर्षांखालील गटातून राष्ट्रीय
स्पर्धेसाठी मुलगे व मुली मिळून एका जिल्ह्यातून जास्तीत जास्त चार खेळाडूंना प्रवेश देता येईल. 16 वर्षांखालील गटातील खेळाडूंची निवड स्पर्धा प्रकारानुसार करण्यात येईल.प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख शनिवार 23 ऑक्टोबर अशी आहे. खेळाडूंनी जन्मतारखेचा अधिकृत पुरावा, नोंदणीची माहिती, छायाचित्र, पत्त्याचा पुरावा, आवश्यक शालेय किंवा संस्थेची कागदपत्रे तयार ठेवावीत. जन्मतारखेच्या पडताळणीकरिता नियमानुसार मूळ जन्मदाखला किंवा परिपत्रकात नमूद केलेला इयत्ता दहावीचा पुरावा सादर करणे आवश्यक असेल.







