| चिरनेर | प्रतिनिधी |
बोकडवीरा गावाशेजारी सिडकोचे सेक्टर 41 येथे मातीच्या भरावाचे काम सुरू आहे. या विरोधात गुरुवारी उरण तहसील कार्यालयावर बोकडवीरा ग्रामस्थांनी कोटनाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कॉ. भूषण पाटील, गोपाळ पाटील, कॉ. रामचंद्र म्हात्रे, हेमलता पाटील आदींची भाषणे झाली. तर बोकडवीरा सरपंच अपर्णा पाटील, गाव अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सचिव श्रीकांत पाटील, माजी सरपंच मानसी पाटील यांच्या शिष्टमंडळाने उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
या भरावामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील नागरिकांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण व्हावे. अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. हे निदर्शनास आणून देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. सेक्टर 41 येथे भरावाचे काम त्वरित बंद करण्यात यावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक ते नाले, गटारे पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग खुले करावेत. तसेच गावात आपत्कालीन निवारा केंद्र व आवश्यक वैद्यकीय सोयींच्या पूर्वतयारी बाबत योग्य ती व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी मोर्चातून केली आहे.







