| कळंबोली | प्रतिनिधी |
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत दोन महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. मुलींची शाळेतील गळती रोखणे, त्यांची नियमित उपस्थिती वाढविणे आणि महिला बचत गटांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, या निर्णयांमुळे महिला व मुलींच्या विकासाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती ममता म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयातील बैठक कक्षात पार पडली. या सभेत महिलांचे सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण आणि महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुलींची शाळेतील गळती रोखणे, शाळेतील नियमित उपस्थिती वाढविणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, या उद्देशाने उपस्थिती भत्ता व शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्याच्या प्रस्तावाला सभेत मंजुरी देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यास आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यास मदत होणार आहे. महिला बचत गटांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिलाई मशीन, घरघंटी, मिरची कांडप मशीन, भाकरी मशीन, पत्रावळी मशीन तसेच इतर आवश्यक व्यावसायिक उपकरणांचा समावेश आहे.
या उपक्रमामुळे महिला बचत गटांची व्यवसायक्षमता वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आणि महिलांना स्वावलंबी उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य होणार आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना स्वतंत्र, सुरक्षित आणि सुलभ व्यायामशाळा तसेच क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषयही सभेत चर्चेला आला. महिलांमध्ये नियमित व्यायामाची सवय वाढविणे आणि क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची सूचना समिती सदस्यांनी केली.
सभेला महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांसह विभागाच्या उपायुक्त डॉ. रूपाली माने, विभागप्रमुख कीर्ती महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चांडक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सभेत यापूर्वीच्या बैठकींमध्ये चर्चिलेल्या विषयांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. तसेच ऐनवेळच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.







