नागरिकांनी पाच जणांना रंगेहात पकडले
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील दांडा परिसरात समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक नागरिकांनी पाच जणांना त्या ठिकाणी जादूटोण्याचा प्रकार करताना रंगेहात पकडले आहे. जादूटोण्याच्या प्रकारासाठी नारळ, लिंबू , काळ्या बाहूल्या व लिंबाला टाचणीने चिकटवलेले फोटो, एक रिकामी दारूची बाटली असे साहित्य त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केले आहे. हे पाचजण पुणे परिसरातील असून, त्यांची इनोवा कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच, यातील एकजण पुण्यातील एका मठामध्ये पुजाऱ्याचे काम करत असल्याबाबत माहिती समोर आली आहे.
जादूटोण्याच्या या अघोरी प्रकारासाठी नारळाला लाल व पांढऱ्या रंगाचे धागे व त्यासोबत काळ्या बाहूल्या, लिंबू इत्यादी पदार्थ गुंडाळून ज्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहन केले जातात त्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात टाकण्यात आलेले होते. या प्रकरणात एका महिलेला तिच्या सासरी नांदवून घेत नसल्यामुळे तिला पुन्हा नवऱ्याकडे नांदायला पाठवण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मागील वर्षभरापासून दांडा येथील स्मशानभूमीमध्ये अनेक वेळा अशा प्रकारे आघोरी कृत्य करण्याचे प्रकार घडले होते. या अगोदर देखील नारळ, लिंबू, फोटो असे प्रकार स्मशानभूमीत मृतदेह दहन केल्यानंतर लगेचच करण्यात येत होते. मात्र, हे प्रकार कोण करत होते? याबाबत उकल होत नव्हती. मात्र, सोमवारी (दि.26) दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील पाच जणं दांडा येथील स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी जागेवर येऊन सर्व वस्तू हस्तगत करून आरोपींना वाहनासह ताब्यात घेतले आहे.
मागील वर्षभरापासून अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारचे अघोरी प्रकार होत असल्याबद्दल नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. परंतु, हे कृत्य करणारे हे बाहेरील नागरिक असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या प्रकरणामध्ये तीन पुरुष व दोन महिला पोलिसांच्या ताब्यात असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या कृत्यामध्ये अजुन कोणी सहभागी आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील आरोपींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







