| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय खेल कूद स्पर्धेत सुधागड तालुक्यातील चेरफळवाडी येथील सौरभ हंबीर याने घवघवीत यश संपादन केले आहे. मुंब्रा येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सौरभने 400 मीटर धावणे आणि लांब उडी या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्व जिल्ह्यांतील स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकाविला. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याची ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सौरभच्या या यशामागे त्याचे वडील हरिकेश हंबीर यांची अथक मेहनत आणि प्रोत्साहन आहे. तसेच, महाराष्ट्र पोलीस दलातील अरुण वाक हे सौरभला लागणारे क्रीडा साहित्य पुरवून मोलाची मदत करत आहेत. खेळाप्रती असलेली त्याची जिद्द आणि चिकाटीमुळेच तो आज या उंचीवर पोहोचला आहे. सौरभच्या या यशाबद्दल उद्धर पंचक्रोशी आणि संपूर्ण सुधागड तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.







