| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील कुंबळे येथे बिबट्याने शेतकऱ्याच्या गोट्यात बांधलेल्या गाईचा फडशा पाडल्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे कुंबळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कुंबळे येथील शेतकरी रविंद्र बालुगडे यांनी मंगळवारी (दि.27) सायंकाळी आपली गुरे नेहमीप्रमाणे चरून आणून गावाबाहेर असलेल्या आपल्या वाड्यात बांधून ठेवली होती. बुधवारी (दि.28) पहाटे ते गुरे सोडण्यासाठी वाड्यात गेले असता त्यांना गाईवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याचे भयानक दृश्य दिसले. या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, पंचनामा केला आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला. दरम्यान, ही पहिलीच घटना नसून, याआधी देखील ताम्हणे आणि गणेशनगर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना बिबट्या दिसला होता. तर, जंगलात एक वासरू मृतावस्थेत आढळले होते. मात्र, आता थेट गावालगतच्या गोट्यात बांधलेल्या गाईवर हल्ला झाल्याने बिबट्याची दहशत वाढली असून, गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.







