| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
पती नांदवत नसल्याच्या कारणावरून अंधश्रद्धेच्या आहारी जात जादूटोणा करणाऱ्या एका भोंदू मांत्रिकासह पाच जणांना श्रीवर्धन पोलिसांनी नुकतीच धडक कारवाई करत अटक केली आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद गरड यांच्या विशेष सतर्कतेमुळे व तात्काळ घेतलेल्या भूमिकेमुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), रायगड जिल्ह्याची टीम तात्काळ श्रीवर्धन येथे दाखल झाली. भविष्यात अशा प्रकारच्या अघोरी व अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटनांना वेळीच आळा बसावा, यासाठी श्रीवर्धन परिसरात ‘अंनिस’ची नवीन शाखा सुरू करण्याचा मानस पोलीस निरीक्षक सुरेंद गरड यांनी व्यक्त केला असून, त्यासाठी पोलिसांकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
अंधश्रद्धेविरुद्ध तातडीने कठोर पावले उचलल्याबद्दल ‘अंनिस’ रायगड शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक सुरेंद गरड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांना महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्याचे पुस्तक आणि ‘दहा संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनावरील अभंगांचे’ पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. पोलिसांचे हे तत्पर कार्य आणि ‘अंनिस’चा हा स्तुत्य पुढाकार यामुळे श्रीवर्धन परिसरातून कौतुक केले जात आहे. या भेटी वेळी ‘अंनिस’चे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष विवेक सभेकर, जिल्हा प्रधान सचिव अमित निंबाळकर, तळा शाखा अध्यक्ष रमेश गायकवाड व आदी पदाधिकारी उपस्थित होते.







