ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त
| खोपोली | प्रतिनिधी |
गावात विकासकामांचे दावे होत असताना खालापूर तालुक्यातील घोडीवली वाडीत मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र समोर आले आहे. गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी रस्ताही उपलब्ध नाही. स्मशानभूमीवरील पत्रे उडाले असून, अन्य कोणत्याही आवश्यक सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्मशानभूमी ही गावातील अत्यावश्यक सार्वजनिक सुविधा असतानाही तिच्या देखभाल-दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने अंत्यविधीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होते. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि प्रतिकूल हवामानामुळे या अडचणी अधिकच गंभीर होतात. स्मशानभूमीवरील पत्रे उडाल्याने पावसापासून संरक्षणाची सुविधाही उपलब्ध नाही.
घोडीवली वाडी ही छोटी वस्ती असल्याने विकासकामांच्या बाबतीत सातत्याने दुजाभाव केला जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. प्रभागातून लोकप्रतिनिधी निवडून येतात; मात्र गावातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी ही गैरसोय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ग्रामपंचायत प्रशासन नेमके कोणत्या विकासाला प्राधान्य देत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्मशानभूमीची दुरुस्ती, अंत्यविधीसाठी पक्का रस्ता आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, की घोडीवली वाडीच्या स्मशानभूमीचा प्रश्न असाच प्रलंबित राहणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.







