| तळा | प्रतिनिधी |
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गरिबीवर मात करता येते, हे तळा शहरातील परीट आळी येथील आदर्श मनीष तळेकर याने सिद्ध करून दाखवले आहे. टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांच्या कष्टांना यशाची जोड देत आदर्शने बी.एच.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आदर्श हा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. तळा येथील महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर संगमनेर येथील आश्विन रूरल आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन साडेचार वर्षांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. नुकत्याच झालेल्या परीक्षेत यश मिळवत त्याने आपल्या मेहनतीचे चीज केले.
आदर्शच्या यशामागे त्याचे वडील मनीष तळेकर यांचा मोठा त्याग आहे. टेलरिंगचा व्यवसाय करून अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. आज आदर्शने मिळवलेल्या यशातून वडिलांच्या कष्टांचे सार्थक झाले आहे. आदर्शच्या यशाबद्दल तळा शहरासह संपूर्ण तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत असून, परीट आळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर जिद्द आणि मेहनतीचा आदर्श निर्माण केला आहे.





