| खोपोली | प्रतिनिधी |
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खालापूर तालुक्यात मात्र विजेच्या लपंडावाने नागरिकांची दिवाळीपूर्व तयारीच विस्कळीत केली आहे. तासभर वीजपुरवठा सुरू राहतो, तर पुढील चार-चार तास वीज गायब होते, अशी परिस्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात महावितरणच्या अनियमित कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना बसत असून, वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत स्वच्छता, रंगरंगोटी, रोषणाई आणि फराळ बनविण्याची लगबग सुरू आहे. मात्र, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे या कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः महिलांना घरगुती कामांचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही भागांत रात्री उशिरा किंवा मध्यरात्री खंडित झालेली वीज थेट सकाळी सुरू होत असल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. या अनियमित वीजपुरवठ्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात घरांमध्ये दिव्यांची रोषणाई करण्याची तयारी सुरू असताना प्रत्यक्षात मात्र अंधाराचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वीज वितरण कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीची कामे केली जात असतील, तर त्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे. मात्र, कोणतीही ठोस माहिती न मिळता वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण आहे. तासभर वीज आणि चार तास अंधार, असा कारभार सुरू असताना महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात तरी अखंडित वीजपुरवठा मिळणे ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खालापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याचा तातडीने आढावा घेऊन वारंवार होणारे वीजखंडित होण्याचे प्रकार थांबवावेत. अन्यथा, सणाच्या आनंदावर विजेच्या लपंडावाचे विरजण पडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आनंदावर विरजण
ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आनंदावर विरजण पडत आहेत. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने अनेक घरगुती उपकरणेदेखील खराब होत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. मागील काही दिवसांपासून ऐन दिवाळीच्या काळातदेखील वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही.







