| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात सध्या भात कापणीचा हंगाम जोरात सुरू असून, रणरणत्या उन्हात शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबताना दिसत आहेत. दिवसभर उन्हाचा वाढता तडाखा सहन करणे कठीण होत असल्याने भात कापणीसाठी सकाळ आणि सायंकाळची वेळ निवडली जात आहे. तर, दुपारच्या वेळी भात झोडणीसाठी शेताच्या बांधावरील वृक्षांच्या सावलीचा आधार घेतला जात आहे. काही ठिकाणी झाडांखाली प्लास्टिकच्या ताडपत्र्या टाकून भात झोडणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा पावसाने ऐन शेवटच्या टप्प्यात दडी मारल्याने भातपिकाला मोठा फटका बसला आहे. अपेक्षित उत्पादन मिळणार नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यातच काही ठिकाणी भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हातात येईल ते पीक सुरक्षित घरात आणण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू आहे. पूर्वी शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने कडक उन्हातही शेतकरी आणि शेतमजुरांना सावलीचा मोठा आधार मिळत होता. मात्र, कालांतराने बांधावरील वृक्षांची संख्या कमी झाल्याने आता सावलीही दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वृक्षांखाली विसावा घेत शेतकरी भात कापणी आणि झोडणीची कामे उरकत आहेत.






