65 आसनी ‘जिजाऊ’ बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर; जुन्या गाड्यांच्या वारंवार बिघाडाने प्रवासी मात्र त्रस्त
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग एसटी आगाराच्या ताफ्यात तीन नव्या गाड्यांची भर पडली असून, बुधवारी या गाड्या पनवेलसह अन्य लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावू लागल्या. 65 आसनक्षमता असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या या ‘जिजाऊ’ बसेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी व्यक्त केला. मात्र, नव्या गाड्यांचे स्वागत होत असतानाच जुन्या बसेसच्या सततच्या बिघाडामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.
जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या अलिबाग एसटी आगारात सुमारे 80 बसेस असून, त्यामध्ये लालपरी, शिवशाही आणि सीएनजी बसेसचा समावेश आहे. आगारात सुमारे 250 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, त्यात दीडशेहून अधिक चालक व वाहक आहेत. अलिबाग आगारातून दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. विविध मार्गांसह लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. अलिबाग-पनवेल विनाथांबा सेवेलाही प्राधान्य दिले जात आहे. मात्र, जुन्या गाड्या वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी सकाळी महाजनेहून अलिबागला येणारी बस बेलकडे ते ढवरदरम्यान बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्याच दिवशी आगारात दाखल झालेल्या तीन नव्या ‘जिजाऊ’ बसेस आता प्रवाशांना कितपत दिलासा देतात, हे पाहावे लागणार आहे.
अलिबाग-कनकेश्वर बस दीड तास उशिराने
अलिबाग आगारातून सायंकाळी 5.30 वाजता नियमित सुटणारी अलिबाग-कनकेश्वर बस बुधवारी तब्बल दीड तास उशिराने सुटली. कामावरून घरी जाणारे कर्मचारी आणि कनकेश्वर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. बसची वाट पाहून वैतागलेल्या वृद्ध आणि महिला प्रवाशांनी सायंकाळी 6.30 च्या सुमारास संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.






