एक जण ताब्यात, तर दुसरा फरार
। कळंबोली । प्रतिनिधी |
दिवाळीच्या ऐन सणासुदीत नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 1 परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका घरात बेकायदेशीरपणे घुसून दोन तरुण मुलींवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या भीषण हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोपरखैरणे सेक्टर 1 मधील एका घरात हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणीच्या कानाजवळून गोळी चाटून गेली, तर तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीच्या पाठीत थेट गोळी घुसली. पाठीत गोळी लागल्याने ती तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमी तरुणींना तातडीने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून मुख्य हल्लेखोर अर्जुन चव्हाण (22) या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात त्याला साथ देणारा त्याचा दुसरा साथीदार राकेश चव्हाण हा मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस सध्या फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
हल्लेखोरांनी या तरुणींवर घरात घुसून नेमका कोणत्या कारणातून गोळीबार केला, याचे मुख्य कारण अजून समोर आलेले नाही. हा प्रकार वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.





