2,700 पानी तक्रार करणारे किरीट सोमय्या आता गप्प का?
सचिन सावंत यांचा सवाल
| मुंबई | प्रतिनिधी |
विरोधकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करायचे, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा आणि संबंधित नेते भाजपसोबत सत्तेत आले की त्यांना क्लीन चिट मिळवून द्यायची, हेच मोदी सरकारच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाचे वास्तव आहे, असा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील पीएमएलएअंतर्गत कारवाई बंद करण्याची मागणी ईडीने न्यायालयात केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
मुश्रीफ यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी आणि आयकर विभागाकडे तब्बल 2,700 पानी तक्रार दाखल केली होती. आता सोमय्या गप्प का? त्यांनी केलेल्या आरोपांची फाईल कुठे गेली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारने विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला आहे. मुश्रीफ यांनी शरणागती पत्करली, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाली आणि त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थंडावली. ते विरोधात असते तर त्यांना हाच दिलासा मिळाला असता का, असा सवालही त्यांनी केला.
तपास यंत्रणांचा वापर भ्रष्टाचाराविरोधात होण्याऐवजी राजकीय सूडासाठी होत असल्याचा आरोप करत, जनतेच्या करातून चालणाऱ्या या संस्थांनी निष्पक्षपणे काम करावे, अशी मागणी सावंत यांनी केली.







