झाडांची अमानुष कत्तल कायमस्वरूपी थांबवण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
टोरंट प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात झालेल्या वृक्षतोडीविरोधात स्थानिक ग्रामस्थांचा लढा अधिक तीव्र होत आहे. जंगलाचे संरक्षण आणि वृक्षतोड कायमस्वरूपी थांबविण्याच्या मागणीसाठी पालीतर्फे कोतवाल-खलाटी येथील ग्रामस्थांनी ऐतिहासिक पाली गावात कँडल मार्च काढून निषेध नोंदवला. झाडांची अमानुष कत्तल कायमस्वरूपी थांबवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
टोरेंट प्रकल्पासाठी सायडोंगर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. या बेसुमार जंगलतोड विरुद्ध पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी हातात मेणबत्त्या घेऊन महिला, तरुण आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जंगल संवर्धनाचा निर्धार केला. वृक्षतोडीला तात्पुरती स्थगिती मिळाली असून शासनाने याबाबत कायमस्वरूपी निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी कॅण्डल मार्चनंतर केली. हा कँडल मार्च पाली गावातील दत्त मंदिरापासून शिव मंदिरापर्यंत काढण्यात आला. यामध्ये महिला, युवक आणि ग्रामस्थांनी हातात मेणबत्त्या घेऊन सहभाग नोंदवला. ‘सायडोंगर वाचवा’, ‘जंगल वाचवा, निसर्ग वाचवा’ अशा घोषणा देत नागरिकांनी वृक्षतोडीचा निषेध केला. सणाच्या दिवशी निसर्ग रक्षणाचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवत ग्रामस्थांनी एकजूट दाखवली आणि वनसंपदेच्या रक्षणासाठी एकजूट दाखवली.
कँडल मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये निसर्गरक्षणाबाबत जनजागृतीही करण्यात आली. वनसंपदा वाचवण्यासाठी एकजुटीने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून सायडोंगर येथील जंगलतोड कायमची थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.






