संसारोपयोगी साहित्य जळून आर्थिक नुकसान
। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या माझेरी गावात नारायण श्रीपत पवार यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून पवार कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर महाड एमआयडीसी आणि महाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार कुटुंबातील तीन भाऊ एकत्र राहत असल्याने या आगीत संपूर्ण कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.






