वाहनचाकांसहित प्रवाशी त्रस्त
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील कोलाड बाजारपेठेतील सर्व्हिस रोडवरील समस्या सुटता सुटेना. या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही धूळ आजूबाजूला उडत असल्यामुळे वाहन चालक, व्यापारी, पादचारी नागरिक या धुळीमुळे त्रस्त झाले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आलेली बारीक कच याचे मोठ्या प्रमाणात धुळीत रूपांतर झाले आहे. ही धूळ आजूबाजूच्या दुकानात उडत आहे, यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय ही धूळ ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात जात आहे. यामुळे येथील नागरिकांना सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास होत आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरु असून, या महामार्गाच्या कामासाठी किती ठेकेदार आले? आणि किती गेले पण या महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही! वर्षातून फक्त 4 किलोमीटर रस्ता तयार केला असता, तरी पळस्पे ते इंदापूर दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असता परंतु, नियोजन शुन्य असल्यामुळे रस्ता अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. आता पावसाला संपून हिवाळा सुरु झाला आहे.
या अंतर्गत रस्त्याचे काम करणे सोयीस्कर झाले आहे. परंतु, अद्याप ही कोलाड बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही. यामुळे मुंबई- गोवा महामार्गांवरील कोलाड सर्व्हिस रोडवरील पसरलेली खडी व उडत असलेली धूळ याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन कोलाड सर्व्हिस रोड सिमेंट काँक्रेटने किंवा डांबरीकरण करून कोलाड नागरिकांची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शासनाचा पैसा वाया
लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख दिली गेली. यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले. याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






