पनवेल महापालिकेच्या लाखो रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह; सायकलींची दुरवस्था झाल्याचा सुरेश खरात यांचा आरोप
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या सायकली आणि व्हीलचेअरच्या वापराबाबत आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या सायकली गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी एका ठिकाणी धूळखात आणि गंजलेल्या अवस्थेत पडून असल्याचा आरोप पनवेलमधील सुरेश खरात यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जनतेच्या पैशाच्या खर्चाचा हिशेब जाहीर करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिव्यांगांसाठी सायकली आणि व्हीलचेअर खरेदी केल्याचे खरात यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र, या साहित्याचे प्रत्यक्षात किती लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले, किती साहित्य शिल्लक आहे आणि त्याची सध्याची अवस्था काय आहे, याबाबत पारदर्शक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. खरात यांनी निवेदनासोबत काही छायाचित्रे जोडली असून, त्यामध्ये सायकली धूळ खात, गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत पडून असल्याचे दिसत असल्याचा दावा केला आहे. दिव्यांगांसाठी खर्च करण्यात आलेला निधी योग्य कारणासाठी वापरला गेला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या सायकलींची खरेदी कोणत्या वर्षी करण्यात आली, किती नग खरेदी झाले, त्यासाठी किती निधी खर्च झाला, तसेच प्रत्यक्ष किती दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे वाटप करण्यात आले, याची माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्याबरोबरच सायकलींच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकारी किंवा ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दुरुस्ती करून वापरण्यायोग्य असलेल्या सायकली तातडीने दुरुस्त करून गरजू दिव्यांगांना वितरित कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. येत्या 15 दिवसांत याप्रकरणी चौकशी करून कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही सुरेश खरात यांनी दिला आहे.







