फवारणीचा खर्च आवाक्याबाहेर, शासनाकडे मदतीची मागणी
| अलिबाग | संतोष राऊळ |
रायगडच्या किनारपट्टीवरील सुपारीच्या बागांवर करपा रोगाचे संकट घोंघावत असून, हिरवीगार झावळ्या अचानक सुकू लागल्याने बागायतदार धास्तावले आहेत. आक्षी, नागावपासून मुरूड आणि श्रीवर्धनपर्यंत अनेक भागांत सुपारीच्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. सात ते दहा वर्षे जपून वाढवलेली झाडेच धोक्यात आल्याने बागायतदारांसमोर उत्पन्नाचे संकट उभे राहिले आहे. रोग नियंत्रणासाठी फवारणी आवश्यक असली, तरी कीटकनाशके आणि ड्रोन फवारणीचा खर्च परवडत नसल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीच्या भागात भातशेतीबरोबरच नारळ आणि सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक बागायतदारांचे संपूर्ण आर्थिक गणित या पिकांवर अवलंबून आहे. नारळाचे पीक वर्षातून सहा ते दहा वेळा मिळते; मात्र सुपारीचे पीक वर्षातून एकदाच येते. सुपारीचे घडही एकाच वेळी पक्व होत नसल्याने 45 ते 60 दिवसांच्या अंतराने टप्प्या-टप्प्याने काढणी केली जाते. त्यामुळे झाडांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. नारळाच्या तुलनेत सुपारीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने या रोगाच्या प्रादुर्भावाने बागायतदारांची चिंता वाढली आहे. या समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी (दि. 13) आक्षी येथे साईकृपा सेंद्रिय शेती गटाची बैठक झाली. यावेळी सुपारी तज्ज्ञ सूर्यवंशी आणि निलेश पाटील यांनी रोगाची संभाव्य कारणे आणि उपाययोजनांची माहिती दिली. गटाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष तथा माजी सरपंच नंदकुमार वाळंज, सरपंच रश्मी पाटील, दिलीप वाळंज, गटाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सुपारी तज्ज्ञ सूर्यवंशी यांनी श्रीवर्धनपासून मुरूड आणि अलिबागपर्यंत केलेल्या पाहणीचा अनुभव सांगितला. काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या बांधकामांमुळे वाढणारी उष्णता, तर काही ठिकाणी पाण्याची कमतरता ही झावळ्या सुकण्यामागील संभाव्य कारणे असू शकतात. मात्र, आक्षी आणि नागावसारख्या निसर्गरम्य भागांतही हीच समस्या दिसत असल्याने केवळ उष्णता किंवा पाण्याची कमतरता हेच कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुपारीच्या कोवळ्या पानांवरील ‘माईट्स’ नावाची कीड पानांमधील रस शोषून त्यांना खरवडते. त्यामुळे पाने करपतात. दुसरीकडे करपा रोगामुळे झाडावरील सर्वच पाने सुकण्याची शक्यता असते. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला आणि नोव्हेंबरअखेरपर्यंत न बरसताच लवकर माघारी फिरला. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नियंत्रणासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची पानांवर फवारणी करणे, तसेच बाधित पाने काढून नष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत नारळ-सुपारी पीक विमा, गोकृपा अमृत आणि जीवामृत यांसारखी सेंद्रिय खते तयार करण्यापासून त्यांच्या वापरापर्यंतचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीनंतर गटाच्या माध्यमातून सेंद्रिय खतनिर्मितीसाठी आक्षीतील बागायतदारांना 200 लीटरचे ड्रम वाटप करण्यात आले.
शासनाने पुढाकार घेण्याची गरज
सुपारीची झाडे उंच वाढत असल्याने शेकडो झाडांच्या सुईपर्यंत फवारणी करणे प्रत्येक बागायतदाराला शक्य नाही. तज्ज्ञांनी ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचा पर्याय सुचवला असला, तरी त्यासाठी लागणारा खर्च आणि कीटकनाशकांची किंमत सामान्य बागायतदारांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी शासनाने सामूहिक फवारणीची व्यवस्था करावी, आवश्यक कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत आणि नुकसानग्रस्त बागायतदारांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास वर्षानुवर्षे जपलेल्या सुपारीच्या बागा उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या करपा रोगामुळे सुपारी बागायतदार मोठ्या चिंतेत आहेत. काही बागायतदारांचे नुकसानही झाले आहे. आक्षी आणि परिसरातील अनेक कुटुंबांचे संपूर्ण उत्पन्न सुपारीवर अवलंबून आहे. त्यामुळे मार्गदर्शन आणि उपाययोजनांसाठी साईकृपा सेंद्रिय शेती गटाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले होते. तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन केले; मात्र बहुतांश बागायतदारांना कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी आणि कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत.
रवींद्र पाटील, अध्यक्ष, साईकृपा सेंद्रिय शेती गट






