राजाभाऊ ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल; हजारोंच्या उपस्थितीत संपर्क मेळावा
| माणगाव | प्रतिनिधी |
मत वाचवा, देश वाचवा या अभियानाच्या माध्यमातून लोकशाही आणि मतदानाच्या अधिकारांच्या संरक्षणाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माणगावात काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संपर्क मेळाव्याला हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. याच कार्यक्रमात नवीन तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, तर पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.
या मेळाव्याला रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजा ठाकूर, जिल्हा कोषाध्यक्ष रामप्रकाश कुशवाह, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष विलास सुर्वे आणि माणगाव तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंह, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आश्पाक पानसरे, जिल्हा खजिनदार राम प्रकाश कुशवाह, निसार फिरफिरे, म्हसला तालुका अध्यक्ष नजमा मुकादम आदी उपस्थित होते. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विविध विभागांचे पदाधिकारी, विविध सेलचे प्रतिनिधी आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजा ठाकूर यांनी भाजपवर मतचोरीचा आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता म्हणून जनतेत उतरून काम करण्याची गरज व्यक्त केली. भाजपकडून मतांची चोरी केली जात असल्याचा मुद्दा जनमानसात पोहोचविण्यासाठीच हा संपर्क मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे काम करायचे आहे, ते जनतेसाठी करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप करत ठाकूर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. या अधिकाराचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खासदार राहुल गांधी हे मत वाचवा, देश वाचवा अभियानाच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.भाजप हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान अशा मुद्द्यांवरून राजकारण करीत असल्याची टीका करताना त्यांनी मंदिरांमधील चोरीच्या घटनांचाही उल्लेख केला. जनतेच्या मूलभूत प्रश्नांऐवजी धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे पक्षविस्तार, ग्रामीण भागातील जनसंपर्क आणि आगामी निवडणुकांच्या तयारीला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






