| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने पुरुषांच्या प्रौढ गट आणि 23 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी विशेष टॅलेंट हंट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत दि.2 डिसेंबर रोजी 23 वर्षांखालील मुलांची, तर 3 डिसेंबर रोजी प्रौढ गटातील खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंमध्ये क्रिकेटचे उत्तम कौशल्य असून, त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करू शकतात. अशा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे, त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि रायगड जिल्ह्याचा सक्षम क्रिकेट संघ घडविणे हा या टॅलेंट हंट उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या निवड चाचणीच्या माध्यमातून खेळाडूंना आपले फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. निवड प्रक्रियेतून गुणवत्तेच्या आधारे पात्र खेळाडूंची निवड करून त्यांना आगामी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी आणि नव्या गुणवंत खेळाडूंना पुढे आणण्यासाठी हा टॅलेंट हंट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र नवोदित व अनुभवी क्रिकेटपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, ऑनलाईन नोंदणी व प्रवेश शुल्काची प्रक्रिया पूर्ण करून निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.







