देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या या आठवड्याच्या सुरुवातीपासून मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध शहरांत सोमवारपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोव्हिड लसीकरण सुरू केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घोषित केल्यानुसार त्यांना भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचे डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. त्यासाठी दिल्लीने या वयोगटांना लसवंत करण्यासाठी दीडशेहून अधिक सरकारी केंद्रे स्थापन केली आहेत तर पुण्यात 40 केंद्रांना या मोहिमेसाठी कोवॅक्सिनचे डोस पुरविण्यात आले आहेत. मुंबईत नऊ जंबो केंद्रांवर या मुलांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संभाव्य तिसर्या लाटेत या वयोगटातील मुलांना असलेला धोका टळण्यास मदत होईल. आठवडाभरापूर्वी दैनंदिन अवघे पाच हजार रुग्ण सापडत होते, तो आकडा आता 30 हजारांच्या पार गेल्याचे दिसत आहे. उदा. शनिवारी देशात 27 हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर रविवारी देशात आढळलेल्या रुग्णांची संख्या 33 हजारांवर गेली. शिवाय चिंतेची बाब अशी की, या नवीन रुग्णांत केवळ कोरोना रुग्णच नाहीत तर ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. आतापर्यंत देशभरातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1700 च्या पुढे पोहोचली आहे. आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार सध्या पॉझिटीव्हीटी रेट 3.84 टक्के आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासारख्या विशाल व दाट लोकवस्तीच्या शहरांत कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी ओमिक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात या नवीन व्हेरीयंटचे 510 रुग्ण असून त्या खालोखाल दिल्लीत 351 रुग्ण आहेत. केरळमध्ये 156, गुजरातमध्ये 136 ओमिक्रॉन बाधित असून एकूण तामिळनाडूमध्ये 121 तर राजस्थानमध्ये 120 रुग्ण आहेत. देशातील सुमारे 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. यावरून या वेगात पसरणार्या व्हेरीयंटची कल्पना येते. शिवाय ही साथ विविध जमावाद्वारे कशी पसरत आहे, यासाठी बिहारमधील नालंदा मेडिकल कॉलेज मधील घटना पुरेशी बोलकी आहे. येथे तब्बल 87 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. मागील आठवड्यामध्ये या कॉलेजमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक कार्यक्रम पार पडला होता. याचवेळी हा कोरोना संसर्ग झाल्याचे दिसते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हीच परिस्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे. अमेरिकेत कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण पुन्हा वाढत आहे आणि सरासरी दैनंदिन संसर्ग चार लाख इतका विक्रमी पातळीवर पोहोेचला आहे. तेथे वैद्यकीय सेवा कर्मचार्यांचा तुटवडा जाणवत असून मदतीसाठी अनेक राज्यांनी त्यांच्या नॅशनल गार्ड्सची जमवाजमव सुरू केल्याचे वृत्त आहे. मात्र ओमिक्रॉनचा प्रभाव हा डेल्टा प्रकारापेक्षा कमी तीव्र दिसत असल्याचे इंग्लंडमधील अभ्यासांनी म्हटले असून तो एक महत्त्वाचा दिलासा आहे. दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरमध्ये ओमिक्रॉन हा नवीन प्रकार आढळला होता. तेथे गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनची लाट शिखरावर गेली आहे. मात्र मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ न होता हे झाले आहे. या दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जगाला भविष्यातील अशा प्रकारच्या महामारी आणि साथीच्या रोगांना रोखण्यासाठी नवीन जैविक सामग्रीसाठी बायोहब प्रणालीची स्थापना केली असल्याचे कळविले आहे. कोरोना व्हायरसची साथ 2022 मध्ये संपेल, असा आशावाद व्यक्त करताना त्यांनी त्यासाठी आपण एकत्र येउन लसीकरण आदीबाबतची असमानता संपवावी लागेल, असे म्हटले आहे. त्यांच्या मते कोव्हिडची साथ रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अनेक नवीन साधने आहेत. मात्र जोवर आणि जितकी जास्त असमानता असेल, तितकाच या विषाणूचा धोका जास्त असेल. कारण अन्यथा त्याचा आपण प्रतिबंध करू शकणार नाही, असे ते म्हणाले आहेत. म्हणजे यातून दोन सकारात्मक बाबी दिसतात. पहिली म्हणजे या तिसर्या लाटेत बाधितांची संख्या वेगात वाढली तरी ती अवघ्या अडीच महिन्यांत शिखरावर जाईल पण त्यात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लसीकरणातील असमानता संपवली तर या रोगापासून बचाव करणे सोपे जाईल. सर्वांचे लसीकरण हा त्यावर वारंवार उपाय सांगितला जात असताना आता किशोरवयीन मुलांचेही लसीकरण होत आहे, ही चांगली बाब आहे. त्याचबरोबर अन्य प्रौढांचे बाकी असलेले लसीकरणही पूर्ण होईल हे पाहायला हवे.






