आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिकतेच्या युगात घर-संसार, नोकरी-व्यवसाय, विद्यार्थी असो वा खेळाडू… प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आम्हालाही पुढे जायचे… काहीतरी करुन दाखवायचे आहे… या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ‘ती’ सतत धडपडत आहे. समोर उभ्या ठाकणार्या अनंत अडचणींवर मात करीत त्यातून महिलांनी नेहमीच जिद्दीने मार्ग काढला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आम्ही महिलांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे नव्हे तर, देशाचेही नाव उज्ज्व केले आहे. म्हणूनच महिला असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, हे उद्गार आहेत रायगडातील आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणार्या रणरागिणींचे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कृषीवल’ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.
रायगडातील उदयोन्मुख नेमबाज: तनिषा मंदार वर्तक

सांघिक क्रीडा प्रकारांपेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारांत सर्वोच्च कामगिरी करणे हे आव्हानात्मक असले तरीही वैयक्तिक खेळातील कामगिरी अधिक गौरवशाली असते, हे अलिबाग तालुक्यातील नागाव येथील रहिवासी तनिषा मंदार वर्तक या युवा खेळाडूने आपल्या कामगिरीने दाखवून दिले आहे. धुनर्विद्या या क्रीडा प्रकारात तिने तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करताना तिने आजवर अनेक पारितोषिके पटकाविली आहेत.
मुली या जात्याच मेहनती आणि जिद्दी असल्याचे दिसतं. मुलं तशी नसतात असं नव्हे, पण कदाचित जन्मजात आणि संस्कारातून हे गुण त्यांच्यात आलेले असावेत. त्याचा कुठेतरी ठसा क्रीडा क्षेत्रातील या यशात दिसून येतो. शिक्षणातही नेत्रदीपक यश मिळवत असतानाच खेळाकडेही लक्ष देण्याची तारेवरची कसरत तनिषा लिलया पार पाडत आहे. मुलीने खेळाकडे वळावे यासाठी पालकही अनुकूल असल्याचेच यावरुन दिसून येत आहे. दखल घेण्याजोगी कामगिरी आजवर तनिषाने तिच्या खेळातून केली आहे. निश्चित करुन ठेवलेले ध्येय गाठण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आणि त्याचबरोबर जिद्द, चिकाटीच्या जोरावर तिने अनेकदा यशोशिखराला गवसणी घातली आहे.
तनिषाने धनुर्विद्या या खेळात 2022-23 या वर्षात जिल्हास्तरावर सुवर्णपदक, राज्य स्तरावर रौप्य, तर राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर, 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर कांस्यपदक, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक, तर लखनऊ येथे झालेल्या स्पर्धेत ग्रुप इव्हेंटमध्ये रौप्यपदक मिळवले आहे.
शालेय स्तरावर खेळताना मुंबई डिव्हिजनल सामन्यांमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. तसेच राज्यस्तरावर नांदेड येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. शालेय स्पर्धांमध्येही ती अग्रेसर असून, दहीहंडीसारख्या पारंपरिक खेळामध्ये व्यवसायिक पद्धतीने सहभाग असतो. गेल्याच आठवड्यात दि. 1 मार्च 2025 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय डिफेन्स अकॅडमी स्पर्धेत पहिली लेवल पार करून तिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वेळोवेळी होणार्या विविध कॅम्पिंगमध्ये सहभागी होऊन बेस्ट कॅम्पर पारितोषिक मिळवले आहे. शालेय स्पर्धांमध्ये तनिषाला यतिराज पाटील यांचे प्रशिक्षण लाभत आहे. तर, धनुर्विद्येचे प्रशिक्षण ती प्रशिक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बावलेकर अर्चरी अकॅडमीमध्ये घेत आहे. तनिषा ही सेंटमेरी कॉनव्हेंट स्कूलची विद्यार्थी आहे.
खेळाबरोबरच तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. खेळात प्रावीण्य मिळवत असताना, तिचे अभ्यासामध्ये कधीच दुर्लक्ष झालेले नाही, परीक्षांमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये ती कायम असते, असे आपल्या लेकीबद्दल वडील मंदार वर्तक आणि आई मीरा वर्तक यांनी अभिमानाने सांगितले. मंदार वर्तक हे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ म्हणून कार्यरत आहेत.
शास्त्रज्ञ होऊन देशाची सेवा करायची आहे: श्रावणी थळे

‘मला इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ व्हायचं असून, देशाची सेवा करायची आहे’, अशी इच्छा श्रावणी अमर थळे हिने व्यक्त केली आहे. श्रावणी मूळची अलिबाग-पंतनगरची रहिवासी आहे. आईवडील नोकरीनिमित्त पनवेल येथे स्थायिक असल्याने तिने सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. दहावीच्या परीक्षेत 2024 साली तिने 98.80 टक्के गुण मिळवून रायगड जिलह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. श्रावणी उत्कृष्ट भरतनाट्यम् नृत्यांगणा असून, तिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. भरतनाट्यम नृत्य प्रकारात तिने पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध नृत्य स्पर्धांमध्ये तिने यश मिळविले आहे. अभ्यास आणि नृत्य या दोन्हींमध्ये तिने आपल्या मेहनतीने नावलौकिक प्राप्त केला आहे. आजवर तिने मुंबई, नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी ठिकाणच्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीनंतर याठिकाणीसुद्धा तिला आणि तिच्या संपूर्ण टीमला येथील व्यवस्थापनाने स्वतःहून नृत्य सादरीकरणासाठी पाचारण करण्यात आले होते. यापेक्षा मोठा गौरव नाही, असेही श्रावणी म्हणाली.
श्रावणीचे वडील अमर थळे हे औषधनिर्मिती कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असून, आई रिना थळे सीकेटी विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. श्रावणीचे आजोबा राम थळे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. आजी तिलोत्तमा थळे हिचे वेळोवेळी मार्गदर्शन होत असते. संपूर्ण कुटुंबाला शैक्षणिक वारसा लाभल्याने त्याचा फायदा मला माझ्या अभ्यासात होत असल्याचे श्रावणीने अभिमानाने सांगितले. सध्या जेईईची तयारी सुरू असून, भविष्यात इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मला काम करुन देशाची सेवा करायची आहे, असेही श्रावणीने सांगितले.
मेहनत घेण्याची तयारी ठेवा, यश निश्चित मिळेल, असेच मी माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सांगेन. माझ्या यशामागे शिक्षकांचा जसा मोठा वाटा आहे, तसाच माझ्या आई-पप्पांचा आहे. अभ्यासाबरोबरच माझा नृत्याचा सरावही कायमच सुरू होता. आई-पप्पांनी मला कधीच हे कर, ते करु नकोस, असा दबाव टाकला नाही. कायम दोन्ही क्षेत्रात पाठिंबा आणि मोकळीक दिली. म्हणूनच मी जे काही यश संपादन केले, त्याचं श्रेय त्यांना आहे.
मोनिकाची गगनभरारी

महावितरण कंपनीत बाह्यस्त्रोतमध्ये काम करताना फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु, अलिबाग तालुक्यातील रामराज शाखेतील महिला कर्मचारी मोनिका औचटकर हिने ती मक्तेदारी मोडीत काढली आहे. विद्युत पोलावर चढून विद्युत जोडणीचे काम त्या करीत आहेत. त्यामुळे त्यांचे काम आदर्शवत असल्याचे चित्र आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील मूळची रहिवासी असणारी मोनिका औचटकर ही तरुणी सध्या उसर येथे राहात आहे. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचे, असा प्रश्न तिच्यासमोर होता. अखेर नातेवाईकांच्या मार्गदर्शनातून व्यावसायिक शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला. आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याची तयारी तिने केली. दोन वर्षांचा इलेक्ट्रिशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच ठिकाणी एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले.
त्यानंतर नोकरीच्या शोधात होते. मात्र, कोरोनामुळे एक वर्षभर घरात बसण्याची वेळ आली. आपल्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे, त्यादृष्टीने कामे करण्यास सुरुवात केली. पंखा व इतर विद्युत साहित्य दुरुस्तीचे काम हाती घेतले. या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. त्यात तिच्या आईकडून कायमच पाठिंबा मिळाला. अखेर महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचारी घेत असल्याची माहिती मिळाली. आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा उपयोग व्हावा, यासाठी अलिबागमधील तत्कालीन कार्यकारी अभियंता तपासे यांच्या कार्यालयात कंत्राटी कर्मचारी निवड करण्याची मागणी केली. त्यांची तात्काळ दखल घेत मला महावितरण कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली.
सुरुवातीला उसर स्विचींग सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून काम मिळाले. हे काम करीत असताना मीटर लावणे आदी कामे करण्यास सुरुवात केली. फणसापूर व रामराज शाखेतील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचार्यांकडून या क्षेत्राबद्दल माहिती घेतली. त्यामुळे या क्षेत्राबाबत खुप काही शिकायला मिळाले. विद्यूत पुरवठा खंडीत झाल्यावर ग्राहक चिडलेला असतो. त्यावेळी त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद साधून त्यांना सुरळीत विद्युत पुरवठा मिळेल यासाठी प्रयत्न त्यांनी केले. थकीत बिलाची वसुली करण्यापासून विद्युत पोलवर चढणे, तार व अन्य विद्युत साहित्यांची जोडणी करण्याचे काम करण्यास सुरुवात केली. गेली साडेचार वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे. पोलवर चढून विद्युत जोडणीचे काम फक्त पुरुषच करीत होते. परंतु, स्त्रीदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हे मोनिका औचटकर या महिला कर्मचार्याने दाखवून दिले आहे. अगदी लहान वयात तिने गगनभरारी घेतल्याचे चित्र आहे.
जिद्दीच्या जोरावर उभारी घेणारी मीलन

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाले येथील मीलन राणे या वैवाहिक जीवनात असताना घरची परिस्थिती नाजूक होती. आपल्या शिक्षणाचा व आपल्याकडे असलेल्या कलेचा आधार कुटुंबासाठी व्हावा म्हणून त्यांनी काहीतरी करण्याची मनात इच्छा बाळगली. कुटुंबाला यातून आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला डाळीचे पापड, फेनी बनवून आठवडा बाजारात विकण्याचा प्रयत्ना केला. त्यांच्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. घरगुती खाद्य पदार्थाला मागणी वाढू लागली. वाढती मागणी लक्षात घेता पापडांच्या पॅकिंगवर भर देण्यास सुरुवात केली.
एखादे काम मनापासून केले, तर त्याला उभारी मिळते हे लक्षात ठेवून राणे यांनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी मनापासून मेहनत घेतली. शासनाच्या योजनेंतर्गत ग्रामविकास अधिकारी भाग्यश्री जा यांच्या मार्गदर्शनाखाली विघ्नहर्ता महिला बचत गटाची स्थापना केली. अनेक महिलांना एकत्र करून खाद्य पदार्थ तयार करण्यापासून ते बाजारात विक्रीसाठी नेण्याचे काम सर्वजण करू लागले. तेथून त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने सुंदर अशी कलाटणी मिळाली.
सर्व महिलांचा विचार करीत आर्थिक विकास साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हळद व इतर उत्पादित केलेल्या मालाला मुंबईमध्ये राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली. स्वतःबरोबरच त्यांच्यासोबत काम करणार्या महिलांचा विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली. राणे यांनी केलेल्या कामाची दखल घेत उत्कृष्ट स्टॉल, उत्कृष्ट विक्री, नारीशक्ती असे अनेक पुरस्कार त्यांना व त्यांच्या ग्रुपला मिळाले. व्यवसाय करीत असताना त्यांची आशा सेविका म्हणून निवड झाली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कृषीभूषण, कोविड योद्धा आदी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
इरसालवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देवदूत: डॉ. सविता काळेल

आयुष्यात मी कठीण आणि अविश्वसनीय प्रवास केला असून, बालरोगतज्ज्ञ, दोन मुलांची आई, मुलगी आणि धर्मपत्नी आहे, माझ्या कर्तव्यात कसूर होणार नाही, याची काळजी घेणे याला मी प्राधान्य देते, असे चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सविता बाबासो काळेल यांनी सांगितले.
वडील भारतीय लष्करात, आई गावात ऊसतोड मजूर व मिळेल ते काम करून आमचा चार भावंडांचा उदरनिर्वाह करत असताना आमच्या शिक्षणावर लक्ष देत असे. तत्कालीन परिस्थितीत गावच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून गेल्यावर आईलाही आपली मुले डॉक्टर व्हावीत असे वाटत असे, आणि तसा प्रयत्न आमच्याकडून घेत असे. भारतीय लष्करातून वडील निवृत्त झाल्यावर आम्ही मुंबईत आलो, वडील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत. आम्ही चारही भावंडे अभ्यासात हुशार असल्याने मला कधीही शिक्षणाची गैरसोय झाली नसल्याने मी आणि भाऊ वैद्यकीय क्षेत्रात पदवीधर झालो, दोन्ही बहिणी उच्च पदावर कार्यरत आहेत. मानव धर्म हाच खरा धर्म, जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले, लाईटचा पत्ता नाही, दळणवळण साधन नाही, आणि सोयदेखील नाही. तरीही बारा वर्षे त्या ठिकाणी सेवा करताना सर्प दंश, विंचू दंश हे नेहमीच असे, पण अनेक प्रसूती रात्री-अपरात्री कराव्या लागत असत, आणि दुर्गम डोंगराळ भागातून चालत प्रवास करून रात्री, अपरात्री रुग्णांची भेट घेऊन उपचार करण्याची सवय जडली होती. जवळपास सर्प व विंचू दंश या रुग्णांचा जीव वाचल्याने त्यांचे नातेवाईक देव भेटल्याची भावना व्यक्त करीत त्यावेळी आपण खरी ईश्वर सेवा करीत असल्याचे स्पष्ट जाणवले.
मला आणखी शिक्षणाची आवड निर्माण झाली, पण लग्नगाठ पडली, मुलगा झाला, कसलीच सोय नाही, मात्र कोकणातील निसर्गरम्य परिसरात अंगणात बसून पुढील अभ्यास करताना मन प्रसन्न होऊन जायचे. कोकणवासियांचा आमच्यावर दृढ विश्वास निर्माण झाल्याने एमपीएससी परीक्षा पास झाले. आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून रुजू झाले. ठाणे येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बदली झाल्यावर प्रचंड कामाचा ताण वाढला, 24 तास नोकरी, नेहमीच पोस्ट मोर्टेम तरीही न थकता सेवा देत राहिल्याने लेडी रजनीकांत असे डॉक्टर, नर्स बोलायचे. कधीही कुठला रुग्ण दगावला नाही, हेच मोठे समाधान मिळते. परत ठाणे येथे मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये बदली झाली, आणि खर्या अर्थाने रुग्णांशी जोडले गेले. सहनुभूतीपूर्ण हृदय, संवेदनशील मन, एक कौशल्यपूर्ण मेंदू या विश्वाला, मानवतेला न्याय देऊ शकतात, हे माझ्या लक्षात आले. मनोरुग्णांची सेवा करताना दुसरी लक्ष्मी घरात आली. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडात दाखल झाले.
चौक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांत कुपोषित बालके, आदिवासी कुटुंबे, रक्तक्षय असलेल्या गरोदर माता जास्त प्रमाणात दिसू लागल्याने प्रभावी जनजागृती, आरोग्य समुपदेशन, आहार मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. याच भूमिकेतून काम करताना परिसरातील कंपन्यांमधून सीएसआर फंडातून शासकीय रुग्णालयाचे रूप पालटले, नवीन शस्त्रक्रिया विभाग याचे नूतनीकरण, दवाखान्याला रंगरंगोटी, गरोदर मातांना खुराख पोषण आहार, लहान मुलांची आरोग्य तपासणी असे विविध कार्यक्रम घेतल्याने आणि बालरोग तज्ज्ञ असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. याच ठिकाणी इरसाल वाडी दुर्घटना रुग्णांची सेवा करता आली. तुमच्या आवडीचे अनुसरण करा, तुमचे शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा, तुम्हाला हवे असलेले जीवन घडवण्याची शक्ती तुमच्यात आहे असा विचार त्यांनी व्यक्त केला. लग्नापूर्वी आईवडील आणि नंतर पतीने साथ दिल्यानेच आपण हा प्रवास करू शकलो, असे डॉ. सविता काळेल यांनी सांगितले.
पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेली महिला पोलीस: मनवर

ठाणे जिल्ह्यातील तलासरी येथे असताना मध्यरात्री पेट्रोलिंग करताना अचानक मेसेज आला, ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकले आहेत, तातडीने बचाव करा! क्षणाचाही वेळ न दवडता पूरग्रस्त ठिकाणी पोहोचले असता रात्रीच्या अंधारात दिसलेले चित्र आजही अंगावर काटा उभा करते.
सध्या खालापूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मनवर यांनी सांगितले. धो धो पडणारा पाऊस, मध्य रात्र, डोळ्याने न दिसणारे समोरचे दृश्य, सोबत दोन सहकारी, एक चालक यांच्याबरोबर पाण्यातून मार्ग काढत अखेर ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधला. बायका, लहान मुलांचा आक्रोश सुरू होता. बचावकार्य करीत असताना प्रत्येक माणसाला धीर देत सुरक्षित ठिकाणी सर्वांना ठेवण्यात आले. हे बचावकार्य करीत असताना रात्र कधी संपली हे कळले नव्हते. माझ्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन माझा सन्मान केला. लहानपणापासूनच पोलीस होण्याचे माझे स्वप्न होते, आणि त्याच दिशेने मी शालेय अभ्यास सुरू ठेवला होता. 2010 साली पदवी मिळाली. 2013 साली पोलीस उपनिरीक्षकपदाची भरतीसंदर्भात जाहिरात आली. दोन वर्षे अभ्यास केल्यावर मी सन 2015 साली नाशिक येथे प्रशिक्षण घेण्यास दाखल होऊन प्रशिक्षण पूर्ण केले. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे दाखल झाल्यावर अचानक रात्री इरसाल वाडी दुर्घटनेची बातमी धडकली आणि या भयाण रात्री इरसाल वाडीचा डोंगर चढून तेथील परिस्थितीचे भयाण वास्तव समोर बघितल्यावर जीवितांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना कंटेनर हाऊस येथे सर्वांचे स्थलांतर होईपर्यंत 24 तास अविरत संवाद सुरू ठेवला.