। अलिबाग । प्रतिनिधी ।
महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाबरोबर प्रशासन, पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. त्या अलिबाग प्रेस असोसिएशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या. वेगवेगळ्या स्तरावर काम करणार्या महिलांच्या कार्याची, योगदानाची दखल घेऊन, त्यांना सन्मानित करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि.7) राजस्व सभागृहात तेजस्वीनी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिती अधिकारी मनिषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी, पुरस्कार प्राप्त महिला व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पवार, तर आभार समीर मालोदे यांनी व्यक्त केले.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महावितरण विभागात कार्यरत असणार्या महिला कर्मचारी मोनिका औचटकर, कलाक्षेत्रातील आपली ओळख निर्माण करणार्या अंकिता राऊत, क्रिडा क्षेत्रातील प्रियांका गुंजाळ, हळद लागवडीतून महिलांना सेंद्रीय शेतीचा मार्ग दाखवणार्या मिनल राणे, तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुचिका शिर्के या कर्तृत्ववान महिलांना तेजस्वीनी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले.
चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल- किशन जावळे
आजच्या महिला या सक्षम आहेत, त्यांच्या हाती पाळण्याची दोरी आहेच पण घरातील तिजोरीची चावीही महिलांच्या हाती आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वयंपुर्णता येत आहे. महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत. अलिबाग प्रेस असोसिएशन त्यांच्या कामावर तटस्थपण लक्ष ठेऊन त्याची दखल घेत आहेत, हे काम कौतुकास्पद आहे. अलिबाग प्रेस असोसिएशनच्या माध्यातून गेल्या 18 वर्षात तेजस्वीनी पुरस्कार मिळालेल्या महिलांवर एक पुस्तक प्रकाशित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, या पुस्तकामुळे आगामी काळात जिल्ह्यातील महिलांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा आशावाद जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला.