आजच्या धकाधकीच्या आणि आधुनिकतेच्या युगात घर-संसार, नोकरी-व्यवसाय, विद्यार्थी असो वा खेळाडू… प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आम्हालाही पुढे जायचे… काहीतरी करुन दाखवायचे आहे… या जिद्दीने, चिकाटीने आणि आत्मनिर्भर होण्याच्या ऊर्मीने ‘ती’ सतत धडपडत आहे. समोर उभ्या ठाकणार्या अनंत अडचणींवर मात करीत त्यातून महिलांनी नेहमीच जिद्दीने मार्ग काढला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आम्ही महिलांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे नव्हे तर, देशाचेही नाव उज्ज्व केले आहे. म्हणूनच महिला असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, हे उद्गार आहेत रायगडातील आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणार्या रणरागिणींचे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कृषीवल’ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत.
जिद्दीच्या जोरावर गिर्यारोहणात रोवले पाय: गिर्यारोहक अक्षदा जंगम

पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या गिर्यारोहण क्षेत्रात आपल्या जिद्दीच्या जोरावर नाव कमावलेली सुधागड तालुक्यातील झाप येथील शिवकन्या अक्षदा अनंत जंगम ही गिर्यारोहक. सर्वसामान्य कुटुंबात जन्म 7 जुलै 1999 रोजी झाला. तिचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. सध्या ती एका कंपनीमध्ये नोकरी करत आहे. लहानपणापासून गड-किल्ल्यांचे आकर्षण होते. एकदा गडकिल्ले फिरायला गेली असताना गडकिल्ल्यांवरील युवक-युवती गडसंवर्धनाचे कार्य करत होते, तेव्हा मलादेखील गडसंवर्धनाची आवड निर्माण झाली. ती आपली नोकरी करत असताना गेली तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त गडकिल्ल्यावर संवर्धन मोहीम केली आहे. तेलबैला या गडावर मी पहिल्यांदा ट्रेकिंग केली. तेव्हा मला भीतीदेखील वाटली होती. मनात जिद्द आणि तीव्र इच्छा शक्तीच्या जोरावर मी या किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंग पूर्ण केली. सध्या ती श्रीमद्रायगिरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध किल्ल्यांवर स्वच्छता करून दुर्गसंवर्धनाचे कार्य करीत आहे. आधी मी फक्त ट्रेकिंग करायचे, गडसंवर्धन काय असते, ते नव्हतं माहीत. हळूहळू गडकिल्ले फिरता-फिरता समजलं की, गडकिल्ले फिरण्याबरोबरच त्यांचं संवर्धन करणं, ही तितकाच महत्त्वाचे आहे. म्हणून मी गडसंवर्धन करण्यासाठी ग्रुपला सामील झाले. कारण, आपल्या पिढीने जर किल्ले राखले, तर पुढच्या पिढीलादेखील ते पाहता येतील. इतिहास तर आपण त्यांना सांगूच; पण तो त्यांना अनुभवतादेखील आला पाहिजे. अक्षदाने आजच्या तरुण मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
चांगला माणूस घडवणे शिक्षकांची जबाबदारी: शिक्षिका स्वाती शिंदे

शिक्षण घेऊन उच्चशिक्षित होण्याबरोबरच तुम्ही चांगले माणूस बनणेही गरजेचे आहे. कितीही शिक्षण घेतले, पण जर तुम्ही समजात आणि दैनंदिन जीवनात वावरताना जर योग्य माणूस नसाल तर त्याचा काहीही उपयोग स्वतःसाठी होत नाही व समाजालाही होत नाही. चांगला माणूस घडवणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे, असे उद्गार काढलेत गेली 25 वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणार्या स्वाती अशोक शिंदे यांनी. भराई शिक्षण संस्थेच्या संत नामदेव माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे आहेत. 1999 पासून आजपर्यंत मी या संस्थेमध्ये मोठ्या सचोटीने आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचे काम करत आहे. माझं शिक्षण एमए बीएड पूर्ण आहे. माझा मुख्य विषय हिंदी असून, मी मराठी विषयातूनसुद्धा एमए पूर्ण केलेले आहे आणि सध्या माझ्या मुख्य विषयातून पीएचडी करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. जीवनाच्या वाटेवरून चालताना सहज मागे वळून पाहिल्यानंतर संपूर्ण जीवनाचा सारीपाठ समोर येतो; अतिशय संघर्षमय जीवनाचा खडतर प्रवास. या प्रवासातून मार्ग काढत माझी वाट चालतच राहिले. संस्थेने मला एक शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या संधीचं मला सोनं करून दाखवायचं होतं, ते मी तन-मन-धन अर्पण करून करत आहे. आज माझ्या हातून हजारो विद्यार्थी घडले गेले आहेत. मी माझं कार्य करत असताना विद्यार्थ्यांचं माझ्याकडून नुकसान होईल, असं कदापिही मी काम केलेलं नाही, तसेच अध्यापन कार्य चालू असताना अनेक प्रकारची प्रशिक्षणेसुद्धा मी घेतलेली आहे. जमेल त्या पद्धतीने मी इतरांना मदत करत आलेले आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून मी शिक्षण घेतले आहे. मला असं वाटतं की, शिक्षण हा एक आपला अलंकार आहे, त्या अलंकाराने आपलं व्यक्तिमत्त्व उजळून निघतं आणि शोभूनदेखील दिसतं. यशाचं शिखर गाठायचं असेल तर संघर्षरुपी नौकेचा प्रवास प्रत्येकाला करावाच लागतो.
पॉवरलिफ्टर सुश्मिता देशमुख

सुश्मिता सुनील देशमुख ही सुधागड तालुक्यातील वाघोशी गावाची कन्या आहे. सध्या ती ठाणे जिल्ह्यातील विटावा येथे राहात आहे. तिचा जन्म 6 नोव्हेंबर 1996 रोजी पाली येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. तिच्या कुटुंबात आई-वडील, भाऊ आणि ती असे चौघेजण राहतात. तिचे वडील मुकुंद कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कामाला आहेत. तिचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण ज्ञान प्रसारणी कळवा येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण न्यू कळवा आणि पदवीधरचे शिक्षण मुंबई विद्यापीठामधून पूर्ण केले. तिला लहानपणापासून खेळाची आवड होती. शालेयस्तरीय स्पर्धेतून विविध प्रकारच्या खेळात सहभाग घेऊन खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.ती रोज फिटनेससाठी नियमित पणे व्यायाम करते त्यातून तिला पॉवर लिफ्टिंगची आवड निर्माण झाली.तिचे प्रशिक्षक विनायक कारभारी आणि निलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका, जिल्हा,राज्य ,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतला.विविध स्तरावरील स्पर्धेतून सुवर्ण ,कांस्य,रौप्य अशा एकूण 84 पदकांची कमाई करून राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट पाँवर लिफ्टिंग खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली.विविध स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लिफ्टर म्हणून गौरविण्यात आले. तिच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल 2018 लोकमत सखी तर 2019 ठाणे गिनीजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सद्या ती सिटी फिटनेस क्लब कल्याण येथील जिममध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून व्यवसाय करत आहे. खेळाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याचा माझा प्रयत्न राहील.तसेच मी जिमच्या माध्यमातून अनेक पाँवर लिफ्टिंग क्षेत्रात राष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे स्वप्न आहे.
सर्वसामान्यांची हक्काची ताई: वासंती उमरोटकर

राजकारण आणि समाजकारणातील महिलांचा सक्रीय सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी होत आहेत. तळागाळातील दीनदुबळ्या, गरजवंतांच्या हक्कासाठी लढणारी समाजसेविका म्हणून मुरुड तालुक्यातील वासंती प्रकाश उमरोटकर यांचे नाव घेतले जाते. मुरुड पोलीस ठाण्याच्या महिला सुरक्षा समितीवर जवळ जवळ 18 वर्षे काम करीत असून, तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांना कौटुंबिक अन्यायापासून न्याय मिळवून दिला आहे. मुरुड संजय गांधी निराधार योजना समितीतवर 19 वर्षे राहून शेकडो गरीब विधवा महिलांना स्वतः फॉर्म भरुन व लागणारी कागदपत्रे गोळा करून अनेकांना यांचा लाभ मिळवून दिला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेची अध्यक्षा असल्याने अनेक मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी काव्य वाचन, काव्य लेखन स्पर्धा तसेच साहित्यिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.
मुरुड शहरामधील भगत आळीमधील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत केवळ जिद्द, चिकाटी, मेहनत व महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावर समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत संजय गांधी निराधार योजना समिती, विशेष कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा दैवज्ञ समाज, लायनेस क्लब ऑफ मुरुड अध्यक्ष पद तसेच कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड अध्यक्षपद भुषविले. मुरुड तालुका अंगणवाडी निवड समिती :- अध्यक्षा 3 वर्षे , संजीवनी आरोग्यसेवा डायलेसीस सेंटर :- संचाालिका, वसंतराव नाईक महाविद्यालय विकास समिती, नगरपरिषद शिक्षण मंडळ , रायगड जिल्हा महिला दक्षता समिती, व्यापारी पतसंस्था संचालक, अखिल जंजिरा उत्कर्ष मंडळ मुंबई , मुरुड तालुका महिला सुरक्षा समिती माजी प्रतिनिधी 2008 पासून ते 2014 पर्यंत अशी अनेक पद भूषविली व यामधून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रसंगात, सुखदुःखात धावून येणार्या ‘आपला हक्काच्या ताई’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पद असो वा नसो आजही तेवढ्याच कर्तव्यभावनेने जनतेच्या व समाजाच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. त्यांची नाळ सामान्य माणसाशी जुळलेली आहे.
राजकारणापलीकडे नातं जपणारी ताई: श्रीमती. दिपश्री दिनेश पोटफोडे

गेली 30 वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात मात्र शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत प्रवास केला असला तरी, पेण येथील एक आजातशत्रू व्यक्तिमत्त्व. राजकारणापलीकडेही प्रत्येकाचे आयुष्य असते, बाळासाहेबांचा 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या शिकवणीची तंतोतंत पालन करणारी व्यक्ती म्हणेजच दिपश्री पोटफोडे. आज पेणमध्ये ‘पोटफोडे वहिनी’ म्हणून सुपरिचित असून, राजकीय मंडळी कोणत्याही पक्षाची असो; परंतु, याचा संबंध त्यांच्यादेखील गोडव्याचा आणि आपुलकीचाच, त्यामुळे कळत- नकळत प्रत्येकाच्या अडीअडचणीला अर्ध्या रात्रीत उभी राहणारे व्यक्तिमत्त्व.
दिपश्री पोटफोडे यांचे माहेरचे नाव राजश्री रजनीकांत खुले, त्यांचा जन्म अलिबाग येथील सारळ. शालेय जीवनापासून संघटन कौशल्य असल्याने एक वेगळीच छबी शालेय जीवनात त्यांनी जोपासली. पुढे महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर पुणे येथे वाणिज्य शाखेतून झाले. वयाच्या 26 व्या वर्षी मूळ गाव रत्नागिरीचे दिनेश पोटफोडे यांच्याशी विवाह झाला. परंतु, दिनेश पोटफोडे हे रत्नागिरीचे असले तरी, त्यांनी आपले कार्यक्षेत्र पेण हे निवडल्याने अलिबागची लेक पेणची सून झाली आणि इथूनच खर्या अर्थाने राजकारणापेक्षा समाजकारणात दिपश्री पोटफोडे यांनी आपला श्री गणेशा सुरु केला. आपल्या समाजासाठी आपण देणे करी आहोत या भावनेतून त्वष्ठा कासार समाजाच्या महिलांना एकत्र करुन 20 वर्षीपूर्वीच महिला मंडळाची स्थापना केली. आज शासन बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीचा विचार करतो. परंतु, 20 वर्षांपूर्वी महिलांना एकत्र करुन त्यांच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा विचार दिपश्री पोटफोडे यांनी केला. त्यांनी या महिला मंडळाच्या माध्यमातून समाजाच्या सांस्कृतीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी स्वतःच्या हक्काची जागा असावी या भावनेतून महिलांना संघटीत करुन महाकाली मंदिराच्या विशेष सुशोभिकरण तसेच देवीच्या दागिन्यांच्या घटवणुकीपर्यंत कार्य केले. आज महाकाली मंदिरातील देवीच्या साजश्रुंगाराचा विचार करता लाखो रुपयांचे दागिने हे महिला मंडळाच्या माध्यमातून तयार केले आहेत. हे सर्व करत असताना समर्थपणे पेण दक्षता कमिटीची जबाबदारीदेखील त्यांनी 10 वर्षे पार पाडली आहे. आजच्या घडीला रोटरी, ईनरव्हील यांच्याबरोबर काम करत असताना पेण शहरातील सर्वांत मोठ्या बचत गटाची उपध्याक्षा म्हणून काम पाहात आहेत. हे करत असताना सामाजिक क्षेत्रातदेखील भरीव कामगिरी केल्याने 2024 ला सोबती संघटनेकडून, तर त्याअगोदर निःशब्द क्रिएशनकडून त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आजही त्या महिलांसाठी अहोरात्र काम करत असून, महिलांची उन्नतीसाठी आपण शेवटपर्यंत काम करणार असल्याचेदेखील त्यांनी बर्याच वेळेला बोलून दाखवले आहे. महिलांसाठी अहोरात्र झटणार्या दिपश्री पोटफोडे यांची सर्वसामान्यांना ओळख व्हावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर: भक्ती गुरुनाथ साठेलकर

भक्ती या पेशाने सिव्हील इंजिनिअर असून, त्या खोपोली नगरपरिषदेमध्ये सिटी कॉर्डिनेटर या पदावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा रोपवन या नावे असलेल्या रोपवाटिकेच्या संचालिकादेखील आहेत.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था-रायगड अर्थात हेल्प फाऊंडेशनच्या त्या समन्वयक आहेत. आजवर त्यांनी शेकडो अपघात आणि अनेक आपत्कालीन घटनांमध्ये मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे.
15 एप्रिल 2023 रोजी बोर घाटात झालेल्या भीषण बस अपघातात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून दरीत कोसळलेल्या बसमधील जखमी प्रवाशांना मदत करून जीवदान देण्यात आणि मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना सहकार्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या अपघाताची माहिती इतर आपत्ती व्यवस्थापन करणार्या संस्थांना देऊन तातडीने तांत्रिक मदत मागवली होती. त्यांनी त्यावेळी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी कौतुक केले होते.
19 जुलै 2023 रोजी इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी रातोरात प्रथम पोहचून सरकारी, निमसरकारी आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधत दरडग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचावी या दृष्टीकोनातून समन्वयकाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे सलग चार दिवस दरडग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यातदेखील मोलाची मदत केली होती. या योगदानाची दखल महाराष्ट्र राज्य विधानसभा सभागृहातदेखील घेतली गेली होती.
फक्त रस्ते अपघातच नव्हे तर, अग्निशमन यंत्रणेसोबत त्या तत्सम दुर्घटनांमध्ये सहकार्य करतात, रसायन आणि वायुगळतीमुळे झालेल्या अपघातातदेखील मदतनीस म्हणून भूमिका बजावतात. पूर परिस्थितीत आणि पाण्यात बुडून झालेल्या अपघातात देखील त्या प्रत्यक्ष सहभाग घेतात. वेळप्रसंगी आवश्यक असलेल्या स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देखील त्यांनी घेतले आहे. त्या प्राणी, पक्षी मित्र म्हणून देखील वनखात्यासोबत आपली जबाबदारी पार पाडतात. कुशल सर्पमित्रांकडून त्यांनी विषारी आणि बिनविषारी साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले असून, त्या स्नेक रेस्क्यूअर्स खालापूर खोपोली या संस्थेच्या सदस्यादेखील आहेत.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, अनेक राज्य रस्त्यावर झालेल्या अपघातात आणि विविध आपत्कालीन घटनांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाची महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, मंत्री अदिती तटकरे, ना. राजेंद्र चव्हाण, ना. भरत गोगावले त्याच प्रमाणे अपर महासंचालक वाहतूक विभाग महाराष्ट्र राज्य डॉ. सुरेशकुमार मेकला, परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य विवेक भीमनवार, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगडचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी मान्यवरांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांना राज्य, जिल्हा, तालुका आणि नगरपरिषद स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही क्षेत्रात आपण कोणतीही जबाबदारी पेलू शकतो, अशा आत्मविश्वासाने त्या सदैव कार्यरत असतात.
रायगडची बालकिल्लेदारीण: शर्विका जितेन म्हात्रे

शर्विका म्हात्रे हे केवळ नाव नाही, तर ते लाखो मुलींसाठी आणि आताच्या नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहे. फक्त सहा वर्षांच्या शविकाने आतापर्यंत शंभरहून अधिक गड-किल्ले सर केले आहेत. तिच्या वयाच्या तुलनेने हा विक्रम खरोखरच खूप मोठा आहे. एखादी सात वर्षांची मुलगी तिच्या सात वर्षांच्या आयुष्यात शेकडो गड-किल्ले सर करीत असेल, तर उर्वरित आयुष्यात ती किती कामगिरी करेल, याचा विचार न केलेला बरा. तिच्या कामगिरीने अलिबाग तालुक्याचे नव्हे, तर रायगड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
शर्विका जितेन म्हात्रे हिने वयाच्या अडीच वर्षांपासून गिर्यारोहणास प्रारंभ केला. वयाच्या अडीचाव्या वर्षी महाराष्ट्रातील कठीण किल्ल्यांपैकी पनवेल-कर्जतजवळील कलावंतीण सुळका दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या. वयाच्या तिसर्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात उंच, नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ला दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी सर्वात कमी वयात सर करणारी महाराष्ट्रातील पहिली कन्या. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई वयाच्या साडेतीन व्या वर्षी दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी अवघ्या साडे तीन तासात सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारी पहिली कन्या. गुजरातमधील सर्वात उंच गिरनार शिखर दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी वयाच्या चौथ्या वर्षी सर करणारी महाराष्ट्रातील सर्वात पहिली आणि लहान कन्या. वयाच्या सहाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वाधिक गिरिदुर्ग असे तब्बल 115 किल्ले यशस्वीपणे सर केले आहेत.
रेकॉर्ड
1) इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (तीन वेळा)
2) आशिया बुक ऑफ रेकॉर्ड (तीन वेळा)
3) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन (दोन वेळा)
4) ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड
5) डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड
पुरस्कार
1) रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा रायगडभूषण पुरस्कार मिळविणारी जिल्ह्यातील सर्वात लहान पहिली कन्या. 2) अलिबाग प्रेस असोसिएशन तर्फे विशेष तेजस्विनी पुरस्कार 3) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे *कर्तृत्ववानलेक पुरस्कार 4)तेजस्विनी फाऊंडेशन तर्फे विशेष पुरस्कार 5)मावळा सन्मान 2020 6)लायन्स क्लब अलिबाग तर्फे विशेष पुरस्कार 7)मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे आदर्श_ बालगौरव क्रिडारत्न पुरस्कार 8)लोकमत ह्या वृत्तपत्रातर्फे विशेष पुरस्कार 9) क्षात्रेय समाज महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे *रायगडची हिरकणी* हा किताब 10)अखिल भारतीय आगरी महोत्सव 2023 तर्फे आगरी भूषण पुरस्कार 11) गर्जा रायगड रत्न पुरस्कार 12) भुमिकन्या पुरस्कार 13) गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार 14) नारीशक्ती पुरस्कार 2024 15) *महाराष्ट्र शिवशंभू प्रतिष्ठान किल्ले तोरणा तर्फे *सह्याद्री रत्न पुरस्कार*
महिलांच्या सक्षमीकरणासाठी झटणार्या अधिकारी : प्रियदर्शनी मोरे

जनतेच्या प्रश्नांची जाण असणार्या अधिकारी म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्याकडे पहिले जाते. प्रियदर्शनी मोरे या यापूर्वी पंचायत समिती उस्मानाबाद, पंचायत समिती पन्हाळा, जिल्हा परिषद कोल्हापूर विविध पदांवर कार्यरत होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी पाणी व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान, घरकुल योजनेत भरीव कामगिरी बजावली आहे. रायगड जिल्हा परिषदेत ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यात महिला बचत गट चळवळ गतिमान करीत, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोण नावाच्या छोट्या गावातल्या एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील प्रियदर्शिनी मोरे यांचा जन्म झाला. वडील चंद्रकांत मोरे आणि आई संजीवनी मोरे दोघेही उच शिक्षित आणि समाजाप्रती बांधिलकी ठेवून जगणारे! त्यामुळे लहानपणापासून तसे संस्कार त्यांच्यावर झाले. इ.6 वी मध्ये असताना एका स्पर्धा परीक्षा केंद्राची जाहिरात वृत्तपत्रामध्ये वाचून आपणही अधिकारी व्हावे असे त्यांनी ठरवले आणि त्यांच्या त्या स्वप्नाला त्यांच्या आई-वडिलांनी बळ दिले. स्पर्धा परीक्षा देऊन त्यांची प्रथम प्रयत्नात 2009 साली विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली. एक वर्ष या पदावर काम करत असतानाच त्यांची राज्यसेवा परीक्षेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी वर्ग-1 या पदावर निवड झाली.
त्या प्रथम गटविकास अधिकारी (वर्ग-1) पंचायत समिती उस्मानाबाद या पदावर रुजू झाल्या. या पदावर कार्यरत असताना त्यांनी पाणीटंचाईचा विषय संवेदनशीलपणे हाताळून प्रत्येक गावात पाण्याच्या पर्यायी स्त्रोतांचे प्रभावी व काटेकोर नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत केला. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सर्वात मोठा टंचाईग्रस्त जिल्हा असतानाही सर्वात कमी टँकर लावण्याची गरज पडली. त्यामुळे शासन खर्चात बचत झाली.
यानंतर गट विकास अधिकारी, पन्हाळा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जि.प. कोल्हापूर या पदावर कार्यरत असताना त्यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी गट विकास अधिकारी म्हणून 2017 साली मा. मंत्री, पेयजल व स्वच्छता, भारत सरकार यांच्या हस्ते सन्मान, राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ आणि सुंदर शौचालय स्पर्धेत जिल्ह्याला दुसरे स्थान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल 2019 साली मा. मंत्री, पेयजल व स्वच्छता, भारत सरकार यांच्या हस्ते सन्मान, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता दर्पण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी 2020 साली केंद्र शासनाच्या वतीने आमिर प्रसिद्ध अभिनेता खान यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कार्यासाठी केंद्र सरकारतर्फे सन्मान, जल जीवन मिशनांतर्गत 100% उद्दिष्टे पूर्ण करून वैयक्तिक नळ जोडणी देण्यात आणि त्यांचे ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान इ प्रमुख पुरस्कार व सन्मानांचा समावेश आहे.
कोल्हापूरमधील पदावधी पूर्ण झाल्यानंतर त्या पदोन्नतीने प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड या पदावर रुजू झाल्या. या पदाच्या प्रमुख जबाबदार्यामध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण महिला स्वयंसहायता गटांची बांधणी, त्यांना प्रशिक्षण आणि अर्थपुरवठा करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे व त्यांना प्रवाहात आणणे या प्रमुख जबाबदार्या आहेत. यास अनुसरून मागील दोन वर्षांत राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत प्राप्त उद्दिष्टानुसार 5 हजार 350 व केंद्र पुरस्कृत 27 हजार अशा एकूण 32 हजार 350 घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी विशेष मोहीम राबवून प्रयत्न करण्यात आले आहे. मागील काही वर्षांतील हा सर्वाधिक घरकुल मंजुरीचा आकडा आहे. येणार्या आर्थिक वर्षात ही घरकुले पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत सध्या जिल्ह्यात 19 हजार 216 गट कार्यरत असून, 883 ग्रामसंघ व 59 प्रभागसंघ स्थापन करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांत फिरता निधी, समुदाय गुंतवणूक, जोखीम प्रवणता निधी इ स्वरुपात सुमारे 73 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून बँक कर्ज पुरवठा सुमारे 406 कोटी 25 लाख इतका उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून स्वयं सहायता गटातील महिला होम स्टे, मसाले, कडधान्ये, लाडू बनवणे, डअछखढअठध झअऊड बनवणे, गणपती मूर्ती बनवणे, खानावळ, सेंद्रिय भाजीपाला इ. व्यवसाय करून स्वताच्या पायावर उभ्या राहात आहे.