। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणार्या रानसई व पुनाडे धरणांची पातळी कमी होत असल्याने उरण नगरपरिषदेने रहिवाशांना आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांत पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आवरे-कडापे, चिरनेर -केलाचामाळ आदिवासी वाडीवरील विहिरीने तळ गाठल्याने व या ठिकाणावरील जलजीवन योजनेची कामे रेंगाळल्याने रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
उरण तालुक्याच औद्योगिकीकरण व नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. अशा तालुक्यातील औद्योगिक व नागरीकरणाला पाणीपुरवठा करणार्या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 10 एमसीएम एवढी आहे, तर जलसंपदा विभागाच्या पुनाडे धरणाची क्षमता जेमतेम 1.75 एमसीएम एवढी आहे. या दोन धरणांच्या पाणीसाठ्यावर अवलंबून राहिल्यास तालुक्याला फक्त 3 ते 4 महिनेच पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी सिडकोचे हेटवणे धरण आणि एमजेपीचे बारवी धरणातील पाण्यावर आजही अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यात ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल यासारखे मोठ मोठे प्रकल्प आणि जेएनपीटीच्या अनुषंगाने निर्माण झालेले मोठमोठे गोदामे यामुळे तालुक्यातील नागरीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरीकरण, औद्योगिकीकरणासाठी लागणार्या पाण्यासाठी मात्र तालुक्यातील नागरिकांना दुसर्या तालुक्यांवर अवलंबून राहावे लागत आहे.
पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून सिडकोच्या माध्यमातून उरणच्या पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, भोम, मोठीजूई, कोप्रोली, खोपटे, विधणे, दिघोडे, वेश्वी, चिलें, जांभूळपाडा, गावठाण तर द्रोणागिरी नोड आणि करंजा या भागाला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणातून जेएनपीटी वसाहत आणि जेएनपीए बंदराला पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातून 20 ग्रामपंचायती, ओएनजीसी, एनएडी, जीटीपीएस, बीपीसीएल, जीटीपीएस वसाहती असे मिळून रोज 30 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तर पुनाडे धरणातून पूर्व भागातील 10 गावांना पाणीपुरवठा केला जातो.परंतु मागील 40 वर्षे या तालुक्याच नेतृत्व करणार्या लोकप्रतिनिधीनी पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार न घेतल्याने आज उरण शहर, चाणजे, हनुमान कोळीवाडा, घारापुरी, सोनारी, पाणजे, नवघर, भेंडखळ, बांधपाडा, रानसई, वशेणी, पिरकोण, आवरे, सारडे, गोठवणे, विधणे, वेश्वी, चिर्ले, धुतूम, कळंबुसरेसारख्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. तसेच, आवरे-कडापे, चिरनेर-केलाचामाल या भागातील जल जीवन योजनेची कामे रेंगाळल्याने तसेच, विहिरीने तळ गाठल्याने या ठिकाणावरील रहिवाशांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या चांदायणी आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्या काळात येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागेल, असे भयानक चित्र समोर येत आहे.
सरकारच्या देखरेखीखाली चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत सुमारे 1 कोटी 80 लाख खर्चाच्या जलजीवन योजनेच काम केले जात आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सदरच्या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका आम्हा आदिवासी बांधवांना सहन करावा लागत आहे. तरी सदर प्रशासनाने केलाचामाल आदिवासी वाडीवर टँकरने पाणीपुरवठा करावा.
– गुलाब सुरेश कातकरी
उरण तालुक्यातील पुनाडे आठ गावातील रहिवाशांना व चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावातील रहिवाशांना सुमारे एकूण 20 कोटींची योजना राबविण्याचा निर्णय शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अंतर्गत घेतला आहे. परंतु ठेकेदारांच्या हम करो सो कामामुळे काम संथगतीने सुरू आहे. ते काम लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– नामदेव जगताप, उपअभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, पनवेल-उरण
उरण तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे किंवा नाही याची मला माहिती नाही. तरी सदर माहिती घेऊन आपल्याला सांगितले जाणार आहे.
– डॉ. उध्दव कदम,
तहसीलदार, उरण