। सुधागड-पाली । वार्ताहर ।
आदिवासी शेतकर्यांसाठी केंद्र शासनाच्या आदिवासी उपयोजना या प्रकल्पांतर्गत नारळ उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच पाली येथे करण्यात आले. यावेळी निविष्ठा म्हणून नारळ रोपांचे वाटप लाभार्थी आदिवासी शेतकरी यांना केले. आणि अर्थाजनाचे एक साधन म्हणून लागवड करावी, असे आवाहन केले गेले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी या संशोधन केंद्राच्या वतीने आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुधागड पाली यांच्या समन्वयाने हे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री. सुतार यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये नारळ लागवड या विषयावर डॉ. विजय दामोधर, सहयोगी प्राध्यापक, काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालय, रोहा यांनी तर नारळावरील कीड रोग व्यवस्थापन यावर डॉ. संतोष वानखेडे, कीटक शास्त्रज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
नारळ लागवडीमध्ये खते आणि पाणी व्यवस्थापन, आंतरपीक, मिश्र पीक यावर नारळ केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. किरण मालशे यांनी सविस्तर माहिती दिली. मंडल कृषी अधिकारी श्री. कोळप यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी, सुधागड पाली कार्यालय आणि नारळ संशोधन केंद्र येथील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.