सायबर विभागाची कारवाई
। पुणे । वृत्तसंस्था।
आरोग्य विभागाच्या गट ’क’ पेपरफुटी प्रकरणात पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून आणखी एका जिल्हा परिषद शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या शिक्षकाचे नाव ‘नागरगोजे’ असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते.
आरोग्य विभागाच्या गट ’क’ भरती प्रक्रियेत पेपरफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे याला अटक झाली होती. उध्दव नागरगोजेचा आणि गळाला लागलेल्या या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.
पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे , प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इत्यादी आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे.
या सर्वांनी काही अधिकार्यांना आणि परीक्षा घेणार्या आयटी कंपन्यांमधील लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे.