। पनवेल । वार्ताहर ।
कोळखे गावासाठी अनेक विकासकामे व निधी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न असून, कोळखे गावासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून घेण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे मत सरपंच मीनल म्हात्रे यांनी व्यक्त केले. शेकापचे युवा नेते आणि ग्रामपंचायत सदस्य रोहन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कोळखे येथे बौद्ध विहार ते राजेंद्र पाटील घर या रस्त्याच्या कामाचे आणि नवीन पाईप लाईनच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या.
कोळखे ग्रामपंचायत खर्या अर्थाने कोकणचे प्रवेशद्वार असून या पंचायतीच्या हद्दीतून जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाला सुरुवात होते. कोळखे ग्रामपंचायतीने सर्वाना सामावून घेतले आहे. इथले लोक गुण्या गोविंदाने राहत असून त्यांच्या विकासासाठी कोणतेही कमतरता राहू न देणे हे आमचे कर्तव्य आहे. आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषदेतून आम्ही जास्तीत जास्त निधी पंचायतीला आणण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असतो. भविष्यात कोळखे एखाद्या लहान नियोजित शहरासारखे दिसू लागेल एवढे सुंदर गाव आम्हाला करायचे आहे. विकासकामे करताना कोणताही भेदभाव केला जात नसून सर्वाना सोबत घेऊन कामे केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. शेकापचे युवा नेते आणि कोळखे ग्रामपंचायत सदस्य रोहन म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विकासकाकामांचे भूमिपूजन होत असल्याचे देखील त्या शेवटी म्हणाल्या. दरम्यान यामध्ये कोळखे गावात नवीन पाईप लाईन टाकणे 4 लाख 90 हजार रुपये आणि बौद्ध विहार ते राजेंद्र पाटील घर या रस्त्याच्या कामाचे 9 लाख 71 हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही दोन्ही कामे 15 टक्के ग्रामनिधीतून करण्यात येत आहेत.
यावेळी उपसरपंच अभिजित सुरते, रोहन म्हात्रे, दिगंबर पाटील, गणेश जाधव, दिनकर मुंढे, नंदकुमार जाधव, जगन्नाथ चवरकर,आकाश पाटील हे उपस्थित होते.






