। पेण । वार्ताहार ।
तालुक्यातील नागरिक आपल्या कामासाठी तहसिल कार्यालयात ये जा करत असतात. मात्र सध्या तहसिल कार्यालयात सर्व सामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे चहा पेक्षा किटली गरम या म्हणी प्रमाणे तहसिल कार्यालयात कारभार सुरू आहे. तहसिलदार, नायब तहसिलदार हे सर्व सामान्य जनतेशी आदबीने वागत असतात. तसेच येणार्या नागरिकांची विचारपूस करत असतात. मात्र अव्वल कारकुन पदावर असणार्या व्यक्ती सर्व सामान्यांना अपमानास्पद वागणूक देऊन उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.
कित्येक सर्व सामान्य नागरिक हे कामानिमित्त आपले प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तहसिल कार्यालयात येतात त्या वेळेला वेगवेगळयाप्रकारे त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून अक्षरः सर्व सामान्यांना हे कारकुन गोंधळात टाकत असतात. त्यामुळे सर्व सामान्यांची गोची होते. दोन दिवसापूर्वी एक महिला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी गेली असता, तिने प्रतिज्ञापत्र हा सरकारी कार्यालयातून दिलेल्या फॉरमॅट प्रमाणे भरून आणला होता. परंतु त्या महिलेचे काही न ऐकता तहसिल कार्यालयातील महिला अव्वल कारकुनाने त्या महिलेला अपमानास्पद वागणूक देउन प्रतिज्ञापत्र केले नाही. महत्वाची बाब म्हणजे जी महिला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी आली होती त्यांचा नवरा कोरोनामध्ये गमावलेले आहेत. त्यामुळे पहिलेच डोक्यावर दु.खाचे डोंगर कोसळलेले असताना त्यातच ही महिला प्रतिज्ञापत्र करण्यास आली असताना तिला दुय्यम वागणूक देउन अपमान करण्यात आले. त्यांचा अश्रुंचा पाट तहसिल कार्यालयातच फुटला. कित्येकांनी हे दृष्य पाहिले परंतु अव्वल कारकुन असलेल्या महिलेला दुसर्या महिलेचे दु.ख समजले नाही हे नवलच. अशा अव्वल कारकुनावर तहसिलदार स्वप्नाली डोइफोडे यांनी वेळेस लगाम घातले नाही तर तहसिल कार्यालयातील सर्व सामान्यांची कामे होणे कठीण होणार आहेत. आणि ज्या अव्वल कारकुन महिलेने अपमान केला आहे या अव्वल कारकुन महिलेने आतापर्यत कित्येक जणांना अपमानास्पद वागणूक दिली आहे.
महसुल विभागाचा महसुल जमा करणे हा येथील कर्मचार्यांचा काम असताना महसुल बुडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे जर अव्वल कारकुन हातभार लावत असतील तर यांच्याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. प्रतिज्ञापत्र केल्याने शासनाचा महसुल वाढतो याची कल्पना या कर्मचार्यांना नाही का? तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट लिहिलेला असतो की, जे काय मी लिहिलेल आहे ते सत्य आहे असत्य आढळल्यास कायदेशीर कारवाईला मी सामोरे जायला तयार आहे. असे असताना देखील मुद्दामहुन कारकुन वर्ग स्वतःचा तोरा मिरवण्यासाठी सर्व सामान्यांना त्रास देताना दिसतात. हया कारकुनांना पहिल्यांदा प्रतिज्ञापत्रा वर सही करण्याचा अधिकार आहे का? तो कोणत्या नियमाने दिला आहे याचेही विचार करण्याची वेळ आलेली आहे.







