। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे (89) यांचे नुकताच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्युसमयी त्यांचे वय वर्षे होते. कोरोना निर्बंध असल्याने अगदी मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत उत्तररात्री अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. सेवाभावी वृत्तीने रुग्ण सेवेला वाहून घेतलेले, सामाजिक भान असणारे, सढळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने एक कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आ. बाळाराम पाटील, शेकापचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, श्रीसाई देवस्थान, वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, डॉ.नितीन म्हात्रे, डॉ.विजय सदाशिव भगत, डॉ. आमोद दिवेकर, डॉ.सी डी कुलकर्णी, आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन डॉ.गिरीश गुणे यांचे सांत्वन केले.
डॉक्टर गोविंद गुणे यांचा मनुष्याला देव माणूस बनण्याचे कसब शिकविणारे देव माणूस! असाच त्यांचा उल्लेख करावयास हवा. कारण त्यांच्याच संस्कारात घडलेले डॉक्टर गिरीश गुणे आज जनसेवेचा वसा तितक्याच नेटाने सांभाळत आहेत.रुग्णसेवा हा व्यवसाय नसून ती मनुष्य सेवा आहे हा विचार डॉ. गोविंद गुणे यांनी रुजविला. तोच संस्कार त्यांनी चिरंजीव डॉ गिरीश गुणे यांना देखील दिला. तब्बल 35 वर्षे त्यांनी या क्लिनिकच्या माध्यमातून गरीब गरजू रुग्णांची सेवा केली. अत्यल्प शुल्क ते सुद्धा असल्यास द्यावे ,अशा वृत्तीने ते जनसेवा करायचे. रुग्णसेवेचे सोबतच रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली. ज्या समाजात आपण अर्थार्जन करतो त्या समाजाचे आपण ऋण फेडले पाहिजे या भूमिकेतून रोटरी क्लब च्या विविध उपक्रमांना ते भरभरून देणग्या देत असत. रायगड जिल्ह्यातील पहिले पीएचएफ डोनर म्हणून त्यांनी सन्मान पटकाविला होता. ते रायगड मेडिकल असोसिएशनचे आजीव सभासद होते.







