नगरपंचायत निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पाडाव
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील मुरबाड नगरपंचात निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले असले, तरी प्रतिष्ठेला मात्र धक्का लागला आहे. कारण पक्षातील बंडखोर कार्यकर्ता दिक्षिता वारे/वरघाडे यांनी अपक्ष जिंकून येत पक्षाकडून अधिकृतरित्या उभे करण्यात आलेल्या दीपिका दीपक खाटेघरे यांचा पाडाव केला आहे. केंद्रीय मंत्री असलेले कपिल पाटील यांनी मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत लादलेले सर्व पाच उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यातच मंत्र्यांचे स्वीय सहायक यांच्या पत्नीच्या विजयासाठी गल्लोगल्ली प्रचार करणारे कपिल पाटील यांची मेहनत यशस्वी ठरली नाही. यामुळे केंद्रीय मंत्र्यांचा गल्लोगल्ली केलेला प्रचार फेल ठरला आहे.
मुरबाड नगरपंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग 1 मधून विकास वारघडे हे भाजपचे तरुण उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तगडे उमेदवार आणि 15 वर्षे सरपंच राहिलेले माजी सरपंच अर्जुन शेळके यांचा पराभव केला होता. त्यानंतर पाच वर्षे प्रभागात चांगले काम करून देखील भारतीय जनता पक्षाने महिला राखीव प्रभागात वारघडे यांना उमेदवारी दिली नाही. त्या ठिकाणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहायक यांच्या पत्नी दीपिका दीपक खाटेघरे यांना उमेदवारी दिली. अखेर विकास वारघडे यांनी पत्नी दिक्षिता वारे-वारघडे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र आपल्या स्वीय सहायक यांच्या पत्नीला भाजपची अधिकृत उमेदवारी देऊन त्यांच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे तब्बल तीनवेळा 700 मतांच्या प्रभागात गल्लोगल्ली फिरून प्रचार करीत होते. मात्र प्रभागात केलेले काम याची मतदारांनी जाण ठेवली आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार दिक्षिता वारे-वारघडे यांना विजयी केले. भाजपच्या बंडखोर उमेदवार यांना 287 तर भाजपच्या अधिकृत उमेदवार खाटेघरे यांना 208 मते मिळाली आणि त्यामुळे मुरबाड नगरपंचायतच्या मतमोजणीत पहिल्याच प्रभागात भाजपला विजय मिळविण्यात अपयश येऊन भाजपच्या बंडखोर उमेदवार विजयी झाल्या.